“सत्ता नसल्यानं वैफल्य येऊ शकतं पण…”, राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

170

सध्या ‘ द काश्मीर फाइल्स’ या बहुचर्चित चित्रपटावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपदेखील सुरु आहेत. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा चित्रपट पाहण्याचे आवाहन करत त्याचे कौतुकही केले. दुसरीकडे विरोधक मात्र हा राजकीय अजेंडा असल्याची टीका करत आहेत. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी चर्चा करतांना ‘काश्मीर फाइल्स’ चित्रपटावरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

काय म्हणाले राऊत?

काश्मीर फाईल्स सिनेमा आल्यावर भाजपला काश्मीर आठवले. गेली ३२ वर्ष हे लोक कुठे होते? हा संवेदनशील विषय असून त्याचे राजकारण करु नये. पाकव्याप्त काश्मीरदेखील भारतात आणत अखंड हिंदुस्थान निर्माण करु असे भाजपाने सांगितले होते. यासाठी लोकांनी मोदींनी मतदान केले होते. आम्ही त्याची वाट पाहत आहोत, असे राऊत म्हणाले. यासह ते असेही म्हणाले की, सत्ता नसल्यामुळे वैफल्य येऊ शकते. पण, हे इतक्या टोकाला पोहोचवू नये. आपल्या राज्यातील लोकांचे जीव जातात. त्याचे राजकारण केले जातेय. इतकं क्रूर पद्धतीचे राजकारण कोणी केले नव्हते. विरोधकांनी हे राजकारण थांबवावे.

(हेही वाचा – राज्यसभेतही गर्जला ‘माय मराठी’चा सूर! राज्यसभाध्यक्षांना घातलं साकडं)

…आणि राऊतांना आली बाळासाहेबांची आठवण

राऊत पुढे म्हणाले, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी काश्मिरी पंडितांची बाजू घेतली होती. त्यांना स्वसंरक्षणासाठी हातात शस्त्र द्या हे सांगणारे बाळासाहेब ठाकरे होते. त्यामुळे तुम्ही आम्हाला शिकवू नका. काश्मिरी पंडितांच्या घरवापसीबद्दल बोला. फक्त सिनेमे काढू नका, असा टोलाही भाजपला लगावला आहे. तर आम्ही कधी सिनेमा काढून प्रचार केला नाही. सध्या लोकशाहीचे भविष्य धोक्यात आहे. विरोधकांनी त्या चित्रपटावरून राजकारण करू नये. आम्ही ठाकरे चित्रपट बनवला. मात्र, तो सुद्धा टॅक्स फ्री केला नाही. काश्मीर प्रकरणावर आम्ही कधी राजकारण केले नाही. दहशतवादी अमरनाथ यात्रेत धमकी देत होते. तेव्हा केंद्र सरकार कुठे होते. बाळासाहेब पहिले नेते होते, त्यांनी असा इशारा दिला की, तेव्हा कोणाच्या केसालाही धक्का लागला, तर तुमचे विमान साधे हजपर्यंत उडणार नाही, अशी धमकी दिली. द काश्मीर फाइल्स चित्रपट कसा बनला, याबाबत मला सगळी माहिती आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.