छत्रपती शिवाजी महाराज मैदानात पावसाळी पाणी वाहून नेण्यासाठी वाहिन्या टाकणे, रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे, मैदानाचा समतल राखणे तसेच पुरातन वारसा असलेल्या प्याऊंचे जिर्णोद्धार आदींच्या माध्यमातून नुतनीकरणावर सुमारे ३ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. यासाठी कंत्राटदाराची निवड करण्यात आली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा सर्व खर्च सीएसआर निधीतून करण्याची मागणी केलेली असताना महापालिकेने यासाठीची निविदा प्रक्रिया पार पाडून या कामांकरता कंत्राटदाराची निवड केल्याने छत्रपती शिवाजी महाराज पार्कातील वातावरण तापण्याची शक्यता आहे.
दिपेश कन्स्ट्रक्शन कंपनीची निवड!
दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदान तथा पार्कमध्ये धुळीच्या प्रदुषणामुळे स्थानिक रहिवाशांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे उंच सखल असल्यामुळे पावसाळ्यात तिथे पाणी साचते. खेळाडुंना विविध खेळ खेळण्याकरता अडचणी येतात. तसेच या पार्कमध्ये अस्तित्वात असलेले पुरातन वास्तू वारसा असलेली प्याऊ जीर्ण अवस्थेत आहे. या सर्व स्थितीवर मात करून या पार्काचे नुतनीकरण करण्याचा निर्णय जी उत्तर विभागाने घेतला आहे. हे काम पावसाळा वगळता पुढील सहा महिन्यांमध्ये करणे आवश्यक असेल. यासाठी दिपेश कन्स्ट्रक्शन कंपनीची निवड करण्यात आली आहे.
(हेही वाचा : सावधान! विनामास्क आढळल्यास आता ५०० रुपये दंड! )
डिसेंबरपूर्वीच काम पूर्ण करण्याचे लक्ष्य!
विशेष म्हणजे या सर्व कामांसाठी कार्यालयीन अंदाज हा ४ कोटी ०७ लाखांचा होता. परंतु कंत्राट कंपनीने २८ टक्के कमी बोली लावत हे काम विविध करांसह ३ कोटी ३७ लाख रुपयांमध्ये मिळवले आहे. हे काम करण्यासाठी खुद्द शिवसेना नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेतला. या प्रस्तावित कामांची पाहणी केल्यानंतरच निविदा प्रक्रीया जी उत्तर विभागाने रावबली होती. त्यामुळे शिवसेनेने या नुतनीकरणाचे काम डिसेंबरपूर्वीच पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. या कामाच्या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी मिळताच येत्या एप्रिल महिन्यापासूनच या कामांना सुरुवात होईल. सध्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या चारही बाजुला असणाऱ्या रस्त्यांचा विकास करता नव्याने पर्जन्य जलवाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे पार्कमधील अंतर्गत भागातील पर्जन्य जलवाहिन्यांचे काम पूर्ण झाल्यास रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून पावसाळी पाण्याची बचत करून त्यांचा वापर तुषार सिंचनाद्वारे मैदानावर पसरवून तेथील गवत हरित राखण्याचा प्रयत्न केला जाईल. जेणेकरून यावरील धुळीमुळे स्थानिक रहिवाशांना आणि खेळाडुंना होणारा त्रासही कमी होईल, असा विश्वास महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
Join Our WhatsApp Community