छत्रपती शिवाजी महाराज कसे दिसायचे?

285

छत्रपती शिवाजी महाराज हे बहुगुणी व्यक्तिमत्व होते. त्यांच्या शरीरयष्टीतूनही त्यांचे व्यक्तिमत्व प्रतिबिंबित होत असे, असे इतिहास संशोधक लिहितात. त्याकाळी फोटोग्राफी हा प्रकार नव्हता, त्यामुळे व्यक्तीचे चित्र रेखाटणे हाच एकमेव मार्ग होता. त्याकाळी काही डच चित्रकारांनी महाराजांचे चित्र काढले होते. त्यांचे संदर्भ मिळत आहेत. तर काही भारतातीलच इतिहासकारांनी दुर्मिळ पुस्तकातून महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा संदर्भ वाचून त्यांचे चित्र रेखाटले आहे. मात्र या सर्व चित्रांमध्ये महाराजांची दाढी, त्यांचे भेदक नजर असलेले डोळे आणि जिरे टोप ही साम्य दिसून येतात. त्या काळातली दुर्मीळ पत्रे, अधिकृत दस्तावेज, परदेशी व्यक्तींनी लिहिलेली प्रवासवर्णने, युरोपियन आणि गोवळकोंड्याच्या संग्रहातली चित्रे, एकोणिसाव्या शतकात एम व्ही धुरंदर यांच्यासारख्या भारतीय चित्रकारांनी केलेली रेखाटने यावरून छत्रपती शिवाजी महाराजांचे रूप नजरेसमोर उभे राहते. त्यांचे व्यक्तिमत्व त्यांचे चित्र नक्की कसे आहे, हा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न आहे. विविध इतिहासकारांना यासंबंधी काढलेली चित्रे आणि त्यांची वर्णने याचा गोषवारा येथे घेण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे दुर्मिळ पुस्तकातील वर्णन

फ्रेंच जगप्रवासी जॉन द तेवनो १६६६ साली सुरतमध्ये आला होता आणि तिथून त्याने दख्खनचा प्रवास केला. छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिल्यावर तो लिहितो, राजे उंचीने थोडे कमी, पिवळसर गौर वर्णाचे आहेत, त्यांचे नेत्र तेजस्वी आणि बुद्धीमत्ता दर्शवणारे आहेत. ते साधारणपणे दिवसातून एकदा जेवण करतात आणि त्यांची प्रकृती उत्तम आहे. सुरत मोहीमेच्या वेळेस त्या शहरात उपस्थित इंग्लिश आणि डच अधिकारी, व्यापारी आणि प्रवाशांनीही छत्रपती शिवाजी महाराजांची वर्णने केली आहेत. अँथनी स्मिथने केलेले वर्णन जॉनल एस्कॉलिएट यांनी लिहून ठेवले आहे. त्यानुसार ‘राजे काहीसे लहान चणीचे आहेत. ते ताठ बांधेसूद शरीरयष्टीचे, चपळ आहेत, बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य दिसते, त्यांची नजर भेदक आहे आणि त्यांच्यासोबतच्या लोकांपेक्षा ते वर्णनाने गोरे दिसतात.’ राजांचे समकालीन असलेल्या आणि त्यांना भेटलेल्या व्यक्तींनी तसेच शिवभारतचे रचनाकार कविंद्र परमानंद अशा कवींनी राजांचे वर्णन केले आहे. साधारण मध्यम उंची, भेदक नजर, दाढी, धारदार नाक, भव्य कपाळ अशी वैशिष्ट्ये आणि जिरेटोप, अंगरखा, तलवार अशी वस्त्रप्रावरणे त्या काळातल्या अनेकांनी नोंदवून ठेवलेली दिसतात.

 छत्रपती शिवाजी महाराजांचे मूळ चित्र कसे आहे?

त्या काळातल्या इतर राज्यकर्त्यांसारखे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात चित्रकार किंवा कलाकार नव्हते. सुरत, गोवळकोंडा अशा ठिकाणी राजांनी भेटी दिल्या तेव्हा तिथल्या कलाकारांनी राजांची चित्रे काढली होती आणि त्यावरूनच राजांचे रूप कसे होते, हे दिसून येते. गेल्या शतकाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांची अनेक चित्रे प्रचलित होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे खरेखुरे विश्वासार्ह चित्र शोधून काढण्याचे श्रेय इतिहासकार वा. सी. बेंद्रे यांना दिले जाते.

( हेही वाचा: स्वातंत्र्यवीर सावरकरांवर श्रद्धा ठेवणारे भागोजीशेट कीर )

बेंद्रे काही काळ भारत इतिहास संशोधन केंद्रात काम करत होते आणि त्यांनीच छत्रपती संभाजी महाराजांविषयीचे अनेक गैरसमज खोडून काढले. बेंद्रे यांनी युरोपातून मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित अनेक कागदपत्रे मिळवली होती. डच दस्तावेजांचा अभ्यास करताना त्यांना एक रेखाचित्र सापडले, जे छत्रपती शिवाजी महाराजांचे असल्याचा उल्लेख होता. सुरत मोहीमेदरम्यान तिथल्या डच वखारीचे गव्हर्नर व्हॅलेंटिन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घेतली होती, तेव्हा दोघांची चित्रे रेखाटली होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्रे व्हॅलेंटिनने एका पत्रासोबत जोडले होते. या चित्रात महाराजांनी अंगरख्यावर एक उपरणे आणि मराठी पद्धतीचे दागिने परिधान केलेले दिसतात. सगळे पुरावे व ते मूळ पत्र शोधल्यावर बेंद्रे यांनी १९३३ साली पुण्यात ते चित्र लोकांसमोर मांडले. महाराजांना प्रत्यक्ष समोर पाहून काढलेले हे एक दुर्मिळ चित्र मानले जाते.

 इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे सांगतात की, ‘छत्रपती शिवाजी महाराज पाच फूट चार इंच उंचीचे होते. त्यांचे नाक बाकदार होते. भव्य कपाळ होते. त्यांचे डोळे बाणेदार होते. चेहऱ्याची उभी ठेवण होती. या तिन्ही चित्रांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची ही वैशिष्ट्ये दिसतात. ‘या चित्रांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वय साधारण ४० ते ५० असेल. राजस्थानी शैलीची मोठी व्यक्ती ज्या पद्धतीचा पेहराव करत असे तसा तो या चित्रांमध्ये देखील दिसून येत आहे. एका चित्रात दांडपट्टा, एकात तलवार दिसत आहेत. मोजडी, जिरोटोपसुद्धा या चित्रांमध्ये दिसून येत आहे.’
गोवळकोंडा शैलीतील शिवाजी महाराजांची चित्रे

गोवळकोंडा भेटीदरम्यान कुतुबशहाच्या दरबारातील चित्रकाराने राजांचे चित्र रेखाटले होते आणि त्या अनुषंगाने पुढे इतर चित्र काढली गेली. त्यातलेच व्यक्तीचित्र मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालयातही पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांची त्या काळातली साधारण २७ चित्रे प्रकाशित झाली आहेत. त्यातील बहुतांश चित्रे ही परदेशात आहेत. सतराव्या शतकातील छत्रपती शिवाजी महाराजांची तीन दुर्मिळ चित्रे पुण्यातील अभ्यासक आणि इतिहास संशोधक मंडळाचे सदस्य प्रसाद तारे यांनी २०२१ साली प्रकाशात आणली. जर्मनी येथील स्टेट आर्ट वस्तुसंग्रहालय, पॅरिस येथील एक खासगी वस्तुसंग्रहालय व अमेरिकेतील फिलाडेल्फिया संग्रहालयात असलेली ही चित्रे दख्खनी गोवळकोंडा चित्रशैलीत काढलेली आहेत.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.