शिवसेनेच्या खासदारांना मतदान करायचे आहे द्रोपदी मुर्मू यांना

आदिवासी समाजातील सक्षम आणि कतृत्त्ववान महिला म्हणून शिवसेनेने भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी लेखी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. याविषयीचे पत्र खासदार शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना भवनात भेट घेऊन त्यांना सादर केले. विरोधी पक्षाच्यावतीने यशवंत सिन्हा यांना उमेदवारी दिली असून एका बाजुला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दुसरी शिवसेना उभी राहत असतानाच शेवाळे यांचे हे पत्र खूप काही बोलून जात आहे.

( हेही वाचा : पोयसर नदीचे पाणी लोकांच्या घरादारात… आयुक्तांच्या घराबाहेर करणार आमदार आंदोलन)

खासदार शेवाळे यांनी पक्षप्रमुखांकडे केली विनंती

खासदार राहुल शेवाळे यांनी आपल्या पत्रात, द्रौपदी मुर्मू यांच्या संवेदनशील सामाजिक आणि यशस्वी राजकीय वाटचालीची प्रशंसा केली आहे. तसेच वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षीय राजकारणाला छेद देत, महाराष्ट्राची कतृत्त्ववान महिला देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान व्हावी, याच हेतूने माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना राष्ट्रपती पदासाठी पाठिंबा दर्शविला होता. तसेच दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कतृत्त्वाचा आदर करत त्यावेळीही शिवसेनेने त्यांना पाठिंबा दर्शविला होता. हीच परंपरा कायम ठेवत, आदिवासी समाजातील एका कतृत्त्ववान महिलेचा सन्मान करण्यासाठी शिवसेना पक्षाने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा आणि त्यासाठी पक्षाच्या सर्व खासदारांना आदेश द्यावा, अशी विनंतीही खासदार शेवाळे यांनी पक्षप्रमुखांकडे केली आहे.

दुभंगलेल्या शिवसेनेच्या पार्श्वभूमीवर काय भूमिका घेणार

मागील काही दिवसांपासून शिवसेनेत बंड करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या सोबतच्या ४० आमदारांच्या गटांबरोबरच काही खासदार सोबत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वी बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीत श्रीकांत शिंदे, राजन विचारे आणि भावना गवळी आदी गैरहजर होते. त्यातच आता राहुल शेवाळे यांनी परखड मत मांडले असून शिवसेना पक्षप्रमुखांना याबाबतच्या सूचना करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे पक्षप्रमुख आता दुभंगलेल्या शिवसेनेच्या पार्श्वभूमीवर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here