बिहार आणि उत्तर प्रदेशातील निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर शिवसेनेने पश्चिम बंगालमधून पळ काढला, मात्र त्याचवेळी ममता बॅनर्जी यांना समर्थन दिले, ‘जय श्रीराम’ म्हणायला लाज वाटणाऱ्या ममता बॅनर्जी यांना सेना पाठिंबा देते, हेच का सेनेचे हिंदुत्व आहे, असा खोचक प्रश्न भाजपचे नेते राम कदम यांनी उपस्थित केला आहे.
सेनेचे हिंदुत्व गेले कुठे?
उत्तर प्रदेश आणि बिहार निवडणुकीत शिवसेनेला एकही जागा जिंकता आली नाही, त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. बंगालमध्येही तीच परिस्थिती निर्माण होईल, संपूर्ण देशात अब्रूचे धिंडवडे निघतील म्हणून शिवसेनेने निवडणुकीतून पळ काढला आहे. आमचे शिवसेनेला आव्हान आहे, त्यांच्यात जर दम असेल, तर त्यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुकीत उतरावे, त्यांना त्यांची औकात कळेल. दुसरीकडे शिवसेनेचे नेते पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना पाठिंबा आहे, असे सांगत आहेत. ज्या ममता बॅनर्जी यांना जय श्रीराम म्हणायला लाज वाटते त्यांना शिवसेना समर्थन देत आहे, कुठे गेले तुमचे हिंदुत्व?, असा प्रश्न भाजपचे नेते राम कदम यांनी केला.
(हेही वाचा : भारतीय मुसलमानांना सौदीत ‘नो एन्ट्री’!)
सोनिया भक्तीची पट्टी लावणाऱ्या काँग्रेसवाल्यांना रामभक्ती काय कळणार?
राम मंदिराचा निर्णय लवकर येऊ नये यासाठी ज्या काँग्रेसने २२ वकिलांची फौज सर्वोच्च न्यायालयात उभी केली, कारण राम मंदिराचा निर्णय लवकर लागू नये, तो ताटकळत राहावा, ज्या काँग्रेस पक्षाने सदैव हिंदूंनाच विरोध केला, काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना राम मंदिर कसे कळणार? राम मंदिराच्या उभारणीसाठी स्वकष्टाचा एक रुपया असावा, त्यात एक वीट असावी, अशी भावना प्रत्येक राम भक्ताची असते. काँग्रेसच्या नेत्यांना रामभक्ती कळणार नाही, कारण त्यांच्या डोळ्यावर सोनिया भक्तीची पट्टी लावली आहे, अशी टीका राम कदम यांनी केली.