गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि गोळीबार हे समीकरण झाले आहे. गेल्या वर्षी म्हणजचे, 2022 मध्ये अमेरिकेत गोळीबारात शेकडो लोकांचा मृत्यू झाला. आता अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेतील व्हर्जिनियामध्ये शुक्रवारी एका प्राथमिक शाळेत विद्यार्थ्याने केलेल्या गोळीबारात एक शिक्षिका गंभीर जखमी झाली. तत्काळ शिक्षिकेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षिकेची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी अद्याप याप्रकरणी सविस्तर माहिती दिलेली नाही. व्हर्जिनियातील न्यूपोर्ट न्यूज शहरातील प्राथमिक शाळेत ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. व्हर्जिनियाचे महापौर फिलिप जोन्स यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, पोलिसांनी याप्रकरणी एका विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. न्यूपोर्टचे पोलीस प्रमुख स्टीव्ह ड्रू यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी दोनच्या सुमारास आम्हाला गोळीबाराच्या संदर्भात काॅलवर माहिती मिळाली. माहिती मिळताच आमचे पथक घटनास्थळी पोहोचले.
( हेही वाचा: अपघातांची मालिका सुरुच; आता शिंदे गटातील ‘या’ आमदाराच्या गाडीला भीषण अपघात )
अधिक तपास सुरु
पुढील तपास केल्यानंतर याप्रकरणासंदर्भात अधिक माहिती दिली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. सध्या पोलिसांनी गोळीबार करणा-या विद्यार्थ्याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. ही गोळीबाराची घटना घडलेल्या न्यूपोर्ट न्यूज शहराची लोकसंख्या 1 लाख 85 हजारांपेक्षा जास्त आहे. हे शहर चेसापीक आणि व्हर्जिनिया बीचपासून 40 मैलांवर आहे. हे शहर यूएस नेव्हीसाठी जहाजबांधणीमुळेही ओळखले जाते.