कांदिवली पश्चिमेला असलेली ‘कपोल विद्यानिधी इंटरनशनल स्कुल’ या शाळेच्या प्राचार्य आणि वर्गशिक्षिका यांनी शाळेची फी न भरणाऱ्या १५ विद्यार्थ्यांना शाळा सुटेपर्यत प्रयोगशाळेत बसवून ठेवण्याची शिक्षा दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शाळा प्रशासनाच्या या कृत्यामुळे संतापलेल्या पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. कांदिवली पोलिसांनी प्राचार्य आणि दोन वर्गशिक्षिकावर बाल संरक्षण कायदा (ज्यूवेनल ऍक्ट) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(हेही वाचा- संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयाचा अल्टिमेटम! म्हणाले…)
पालकांची शाळेविरुद्ध न्यायालयात याचिका
कांदिवली पश्चिम येथे राहणाऱ्या शेअर्स ब्रोकर्स यांची १४ वर्षाची मुलगी कांदिवली पश्चिमेतील ‘कपोल विद्यानिधी इंटरनशनल स्कुल’ या शाळेत इयत्ता ९ वी मध्ये शिकत आहे. या विद्यार्थीनीच्या पालकांनी कांदिवली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची मुलगी या शाळेत नर्सरी पासून शिकत आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थी यांचे शिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने सुरू होते. शाळेने मुलांना ऑनलाइन शिक्षणासाठी कुठलेही साहित्य पुरवले नाही, मुलांनी शाळेचे कुठल्याही वस्तू वापरलेल्या नसतांना देखील पालकांकडून शाळेची पूर्ण फी घेण्यात आली. याप्रकरणी अनेक पालकांनी मिळून शाळेविरुद्ध उच्च न्यायालयात मार्च २०२२ मध्ये याचिका दाखल केली असल्याची माहिती तक्रारीत दिलेली आहे.
असा घडला प्रकार
१ एप्रिल रोजी सकाळी शाळेची प्रार्थना संपल्यानंतर विद्यार्थी वर्गात गेले असता वर्ग शिक्षिका शिवप्रिया यांनी तक्रारदार यांच्या मुलीला वर्गातून बाहेर काढत मुख्य विभाग प्रमुख यांना भेटण्यास सांगितले. तक्रारदार यांची मुलगी आणि तिची वर्गमैत्रिण या दोघी त्यांना भेटण्यास गेल्या असता त्यांना दुसऱ्या मजल्यावरील फिजिक्सच्या प्रयोगशाळेत बसण्यास सांगितले.
शाळेच्या प्राचार्यासह दोन वर्गशिक्षिकांविरुद्ध तक्रार दाखल
त्या ठिकाणी ९ वी आणि दहावीतील आणखी २० ते २५ ठिकाणी विद्यार्थी आले व त्यांना देखील प्रयोगशाळेत बसण्यास सांगितले. एका पुरुष शिक्षकाने त्यापैकी १० ते १५ विद्यार्थ्यांना शिकवले व इतरांना न शिकवता शाळा सुटेपर्यत प्रयोगशाळेत विनाकारण बसवून त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले. हा प्रकार मुलांनी घरी येऊन पालकांना सांगितला आणि पालकांनी कांदिवली पोलीस ठाण्यात धाव घेऊन शाळेच्या प्राचार्य आणि दोन वर्गशिक्षिका यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. १० ते १५ विद्यार्थ्यांना वेगळ्या खोलीत बसवून त्यांना वेगळी वागणून देवून त्यांचे बालमनास वेगळी भावना निर्माण करून मानसिक त्रास तसेच त्यांना शिक्षण न देता त्यांचे नुकसान केले. अशी तक्रार पालकांनी केली असून कांदिवली पोलिसांनी शाळेच्या प्राचार्य आणि दोन शिक्षिकाविरुद्ध बाल संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नसून तपास सुरू असल्याची माहिती कांदिवली पोलिसांनी दिली आहे. फी साठी जर विद्यार्थ्यांना शाळेकडून या प्रकारची वागणूक देऊन त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रकार घडला असेल तर शाळेविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.