मुंबईत मालाड इथल्या शाळेत लिफ्टमध्ये अडकून शिक्षिकेचा मृत्यू झाला आहे. जेनेली फर्नांडिस असे या शिक्षिकेचे नाव आहे. लिफ्टमध्ये अडकून जखमी झालेल्या या शिक्षिकेला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डाॅक्टरांनी या शिक्षिकेला मृत घोषित केले. मालाडच्या चिंचोली फाटक नजीकच्या सेंट मेरी इंल्गिश स्कूलमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.
फर्नांडिस जून 2022 पासून या शाळेत सहशिक्षिका या पदावर कार्यरत होत्या. शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास सहाव्या मजल्यावरील वर्गात शिकवणी संपवून फर्नांडिस दुस-या मजल्यावर निघाल्या. त्यासाठी त्यांनी लिफ्ट बोलावली, लिफ्ट आल्यावर फर्नांडिस आत गेल्या. मात्र, दरवाजा बंद होण्याआधीच लिफ्ट वरच्या दिशेने जाऊ लागली. त्यामुळे लिफ्टमध्ये अडल्याने त्या जखमी झाल्या.
( हेही वाचा: ‘आप’चे आमदार अमानतुल्ला खान यांना अटक; ACB ची मोठी कारवाई )
घटनेची चौकशी होणार
या घटनेनंतर स्टाफमधील सहकारी त्यांच्या मदतीसाठी धावल्या आणि फर्नांडिस यांना त्यांनी बाहेर काढले. जखमी फर्नांडिस यांना तत्काळ नजीकच्या लाईफलाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले. मालाड पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणी पोलीस लिफ्टची देखभाल करणा-या एजन्सीची चौकशी करण्याची शक्यता आहे. लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाला की यात कोणाचा निष्काळजीपणा आहे याबाबत चौकशी होण्याची शक्यता आहे. सध्या या घटनेमुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत आता प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
Join Our WhatsApp Community