कैद्यांना ठेवण्यात येणाऱ्या बॅरेकमध्ये इलेक्ट्रिक सर्किट बोर्ड, मोबाईल फोन, टाचण्या आणि एमसील आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली. हे सर्व साहित्य कल्याणच्या आधारवाडी तुरुंगात दोन दिवसांपूर्वी सापडले असून, हे साहित्य तुरुंगात कोणी आणले व त्यामागे काय कारण होते, याचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी तुरुंग अधिकारी यांच्या तक्रारीवरुन खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बॅरेकमध्ये असणाऱ्या कैद्याकडे याबाबत कसून चौकशी करण्यात येत आहे.
झडती दरम्यान आढळल्या वस्तू
कल्याण येथील आधारवाडी जिल्हा तुरुंगातील सर्कल क्रमांक-३ लाईन-१ येथील ७ नंबरच्या खोलीत काही संशयास्पद वस्तू असल्याची माहिती आधारवाडी तुरुंगाच्या अधिका-यांना मिळाली. या माहितीच्या आधारे ६ ऑगस्ट रोजी दुपारी तुरुंग अधिकारी आणि पथकाने सर्कल-३ मध्ये विशेष झडती मोहीम राबवली असता, सर्कल-३ मधील ७ नंबरच्या खोलीत असणाऱ्या स्वछतागृहात एका प्लास्टिकच्या पिंपात एक लोणच्याची बॉटल सापडली. त्या बॉटलमध्ये एक मोबाईल फोन, टाचण्या, एमसील आणि दुसरीकडे इलेक्ट्रिक सर्किट बोर्ड आढळून आला.
(हेही वाचाः धक्कादायक! परदेशी ड्रग्स तस्कराकडून एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला!)
मोठा कट शिजत होता?
या सर्व वस्तू बघून तुरुंग अधिका-यांना धक्काच बसला. या वस्तू कैद्याच्या सर्कल मधील खोलीत कुठून आणि कोण घेऊन आले, याबाबत काही कळू शकले नाही. आधारवाडी तुरुंगात अनेक गंभीर गुन्ह्यातील कैदी असून, या वस्तू त्यापैकी कुठल्यातरी कैद्याने आणल्या असाव्यात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तुरुंगात काहीतरी मोठा कट शिजत असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र तुरुंगात येणाऱ्या प्रत्येक कैद्याची, तसेच कर्मचा-यांची कसून तपासणी करुन देखील, या वस्तू तुरुंगात आल्यामुळे तुरुंगातील रक्षकांवर देखील संशय असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
याप्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली असून, पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
(हेही वाचाः भुकेलेल्या तरुणीला जेवणाचे आमिष दाखवून रिक्षेत बसवले आणि मग…)
Join Our WhatsApp Community