उद्यानात बिबट्यांचा व्हिडिओ चोरीछुपे काढला, समाजमाध्यमांवर फिरणा-या व्हिडिओचे जाणून घ्या सत्य

इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावर पिंज-यातील बिबट्याचा व्हिडिओ प्रसारित करण्याची स्टंटबाजी दोन मुलांना चांगलीच महागात पडली आहे. हा व्हिडिओ बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील असून, पर्यटकांना जाण्यास बंदी असलेल्या क्षेत्रात चोरीछुपे घुसून हा व्हिडिओ काढण्यात आला. यश पांचाळ आणि नवाब पठाण या दोन मुलांना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाने चौकशीकरिता सोमवारी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. दोघांवरही जंगलात निषिद्ध जागेत प्रवेश केल्याबद्दल तसेच व्हिडिओ प्रसारित केल्याविरोधात वनगुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

(हेही वाचा – बदनामीचा प्रयत्न असल्याचे म्हणत…’त्या’ व्हायरल होणाऱ्या पत्रावर शिंदे गटाचे स्पष्टीकरण)

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून अंदाजे दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर मॅप्को फॅक्टरी नावाने ओळखल्या जाणा-या भागांत उद्यानातील पिंज-यांतील बंदिस्त बिबट्यांचे अनाथालय आहे. या भागांत पर्यटकांना प्रवेश दिला जात नाही. बोरिवली पूर्वेतच राहणा-या काजूपाडा येथील यश पांचाळ आणि नवाब पठाण या मुलांनी वनाधिका-यांची नजर चुकवून या निषिद्ध भागांत प्रवेश केला. बिबट्या अनाथालयाला लागून असलेल्या भिंतीवर चढून एकाने मोबाईलवर पिंज-यातील बिबट्याचा व्हिडिओ रॅकोर्ड केला. ३० ऑगस्ट रोजी दोघांच्याही इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला. या प्रकरणाची माहिती मिळताच दोघांनाही उद्यान प्रशासनाने चौकशीसाठी बोलावले आहे.

मोबाईलवरुन व्हिडिओ काढून टाकल्यास….

कारवाईच्या भीतीने दोन्ही मुलांनी मोबाईलवरुन व्हिडिओ काढून टाकून पुरावा नष्ट केल्यास कारवाई निश्चितच केली जाईल, असे पत्राद्वारे उद्यान प्रशासनाने दोघांनाही ठणकावले आहे. दोघांनाही चौकशीसाठी सोमवारी कोणत्याही परिस्थितीत सामोरे जावे लागणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here