भारीच! ‘लालपरी’चे तिकीट दाखवा अन् मोफत नेत्रतपासणी करून घ्या!

137

एसटीचे तिकीट दाखवा आणि मोफत नेत्रतपासणी करून घ्या, अशी एक आगळीवेगळी योजना रत्नागिरीतील इन्फिगो आय केअर हॉस्पिटलने महिन्याभरासाठी आखली आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी वाहतूक ठप्प झाली होती. आता संप मागे घेतल्यामुळे एसटी पुन्हा रस्त्यावर धावणार असल्याने इन्फिगो आय केअरने एसटीचे तिकीट दाखवा आणि मोफत नेत्रतपासणी करा, असा समाजोपयोगी उपक्रम सुरू केला आहे. आजपासून १९ मेपर्यंत रत्नागिरीत साळवी स्टॉप येथील इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमध्ये ही सेवा देण्यात येणार आहे.

… म्हणून सुरू केला हा अनोखा उपक्रम

डोळा हा मानवी शरीरातील महत्त्वाचा अवयव असून सर्वांनी आपल्या डोळ्याची पुरेशी काळजी घेतली पाहिजे. दोन वर्षे कोरोना महामारी आणि टाळेबंदीमुळे डोळ्यांची तपासणी करण्यासाठी अनेक रुग्णांना वेळेवर डॉक्टरांकडे जाता आले नाही. यामुळे मोतीबिंदूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली. ऑनलाइन काम व अभ्यासामुळे लहान मुलांसह मोठ्यांमध्येही कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम पाहायला मिळाला. कोरोना कमी होत असताना एसटीचा संप सुरू झाला आणि अनेक रुग्णांना पुन्हा येताना अडचणी येऊ लागल्या. आता पुन्हा मोठ्या प्रमाणात प्रवाशांनी एसटीने प्रवास केला पाहिजे आणि आपल्या डोळ्यांचीही काळजी घेतली पाहिजे, या हेतूने इन्फिगो हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी प्रवाशांसाठी मोफत नेत्रतपासणीची संकल्पना मांडली.

(हेही वाचा – ठाणेकरांनो तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी! घोडबंदर रोडवरील वाहतुकीत बदल )

कधीपर्यंत असणार हा अनोखा उपक्रम

आजपासून १९ मे या कालावधीत एसटीने प्रवास करणाऱ्या ग्रामीण भागातील प्रवाशांना तिकीट दाखवून इन्फिगोमध्ये मोफत नेत्र तपासणी करून घेता येणार आहे. इन्फिगो आय केअरची रत्नागिरी, वाशी (नवी मुंबई), बोरिवली, भाईंदर, विरार, पालघर, बोईसर, मुरबाड, पुणे, सांगली आणि इचलकरंजी येथे सुसज्ज रुग्णालये आहेत. इन्फिगोने गेल्या दीड-दोन वर्षांत ३६ हजारांहून अधिक नेत्ररुग्णांची तपासणी, उपचार केले आहेत. मोतीबिंदूचे ६०००, गुंतागुंतीच्या रेटिना समस्या ८००, तिरळेपणावरील शस्त्रक्रिया ३०, कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोमच्या २००० रुग्णांवर उपचार केले आहेत. मधुमेहामुळे डोळ्यांच्या पडद्याचे नुकसान होते. याकरिता दर महिन्याला रेटिनातज्ज्ञ रुग्णांची तपासणी करतात. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून ‘गोष्टीतून दृष्टी’ या मालिकेत डॉ. ठाकूर सलग पाच महिने दररोज दोन बोधकथा सांगत आहेत. डोळ्यांच्या बाबतीत सर्व माध्यमांतून ते प्रबोधन करत आहेत. नेत्रतपासणी आणि नाव नोंदणीसाठी ९३७२७६६५०४ या मोबाइलवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.