संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या देशाची राजधानी दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडाने देशभरात एकच खळबळ उडाली आहे. या श्रद्धा हत्याकांडानंतर डेहराडूनमधील अनुपमा गुलाटी हत्याकांड पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 2010 साली डेहराडूनच्या शांत दून व्हॅलीमध्ये अशी घटना घडली होती, ज्याने डेहराडूनच नव्हे तर अवघ्या देशाला हादरवून सोडले होते. 17 ऑक्टोबर 2010 रोजी अनुपमाचा पती राजेश गुलाटी याने तिची निर्घृण हत्या केली होती. ही घटना श्रद्धा हत्याकांडापेक्षाही भयंकर होती.
काय आहे प्रकरण
अनुपमा गुलाटी नावाच्या महिलेचा पती राजेश याने क्रूरतेची हद्द पार करत अनुपमाची हत्या केली. यानंतर त्याने तिच्या मृतदेहाचे 72 तुकडे केले. त्याने नुसतेच तुकडे केले नाही तर ते त्याने डीप फ्रीजरमध्ये ठेवले. अनुपमाच्या कुटुंबीयांचे अनेक दिवसांपासून तिच्याशी बोलणे झाले नाही, यानंतर 12 डिसेंबर 2010 रोजी तिचा भाऊ सूरज दिल्लीहून डेहराडूनला पोहोचला. तेव्हा त्याला बहिणीच्या हत्येची माहिती मिळाली आणि हे हत्याकांड उघडकीस आले. 2011 मध्ये डेहराडून पोलिसांनी या प्रकरणी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.
राजेशने अनुपमाची अशी केली हत्या?
दिल्लीची रहिवासी असलेल्या अनुपमाने 1999 मध्ये राजेशसोबत प्रेमविवाह केला होता. राजेश हा व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. गुलाटी दाम्पत्य डेहराडूनच्या प्रकाश नगरमध्ये मुलांसह राहत होते. दोघेही 2000 मध्ये अमेरिकेत गेले होते. 6 वर्षांनी परत आल्यानंतर दोघेही डेहराडूनला स्थायिक झाले. हत्येवेळी गुलाटी दाम्पत्याची दोन्ही मुले अवघ्या 4 वर्षांची होती. अनुपमा आणि राजेश गुलाटी यांच्यात वारंवार भांडणे होत होती आणि खुनाच्या दिवशीही भांडण झाल्यानंतर अनुपमाचे डोके बेडच्या कोपऱ्यावर आदळले. यानंतर राजेशने अनुपमाच्या चेहऱ्यावर उशी ठेवून तिचा खून केला.
हत्येचा प्लॅन एका हॉलिवूड चित्रपटातून केला
पोलिसांनी राजेशची चौकशी केली असता, हॉलिवूड चित्रपट पाहताना राजेशला अनुपमाच्या हत्येची कल्पना सुचली. त्याने केलेला हा गुन्हा लपविण्यासाठी राजेशने डीप फ्रीझर विकत घेतला आणि त्यात अनुपमाचा मृतदेह ठेवला. या गारठलेल्या मृतदेहाचे तुकडे हळूहळू मसुरीच्या जंगलात फेकायला सुरुवात केली. यादरम्यान, अनुपमाच्या भावाला सत्य उघडकीस झाले. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी राजेशला अटक करून न्यायालयात हजर केले. सुनावणीनंतर न्यायालयाने जन्मठेप आणि 15 लाखांचा आर्थिक दंडही ठोठावला.
Join Our WhatsApp Community