श्रद्धा हत्याकांड: ‘तो’ एक फोन आणि आफताबने पुरावे नष्ट करण्यास केली सुरुवात

173

देशात खळबळ माजवणा-या श्रद्धा वालकर हत्याकांडाचा तपास दिल्ली पोलिसांकडून करण्यात येत आहे. दिल्ली पोलिसांच्या तपासात काही गोष्टी समोर येत असून वसईतील मणिकपूर पोलिसांनी या प्रकरणात निष्काळजीपणा दाखवला का? अशी चर्चा सुरु झाली आहे. वसई पोलिसांनी या तपासातील मानकांचे पालन केले नाही का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. वसई पोलिसांकडून करण्यात आलेल्या एका फोन काॅलनंतर आफताबने श्रद्धाच्या हत्येचे पुरावे नष्ट करण्यास सुरुवात केली, असा दिल्ली पोलिसांचा कयास आहे.

काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांचे पथक चौकशीसाठी वसईत दाखल झाले होते. या दरम्यान दिल्ली पोलिसांनी श्रद्धा आणि आफताबचे मित्र, त्याचे सहकारी, नातेवाईकांची चौकशी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, श्रद्धा हरवली असल्याची तक्रार मणिकपूर पोलिसांना 12 ऑक्टोबर रोजी मिळाली होती. त्यानंतर मणिकपूर पोलिसांनी याप्रकरणी श्रद्धाचा लिव्ह इन पार्टनर आफताब पुनावाला याला 20 ऑक्टोबर रोजी संपर्क साधला होता. आफताबला 23 ऑक्टोबर रोजी वसईत चौकशीसाठी बोलवण्यात आले होते.

…तर अनेक गोष्टींचा उलगडा झाला असता

वसई पोलिसांच्या या फोन काॅलनंतर आफताब अधिक सतर्क झाला आणि त्याने पुरावे नष्ट करण्यास सुरुवात केली असल्याचे समजते आहे. वसई पोलिसांनी बोलवल्यानंतर आफताब हा दिल्लीहून वसईत आला. त्याने 20 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर दरम्यान श्रद्धाचा मोबाईल भाईंदरच्या खाडीत फेकून दिला. श्रद्धाचा मोबाईल पोलिसांच्या हाती लागला असता तर अनेक गोष्टींचा उलगडा झाला असता.

( हेही वाचा: भीषण दुर्घटना: ब्रिज तुटला, 20 फुटांवरून प्रवासी खाली कोसळले )

श्रद्धाचे व्हाॅट्सअॅप अकाऊंट सुरु करण्याचा प्रयत्न सुरु

पोलिसांकडून श्रद्धाचे व्हाॅट्सअॅप अकाऊंट सुरु करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. जेणेकरुन जुने चॅट्स, फोटो रिकव्हर करता येतील. पोलिसांकडून तांत्रिक पुरावे जमा करण्यात येत असून, 20 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर दरम्यान श्रद्धाचा फोन अॅक्टिव्ह होता, असे आढळले असल्याची माहिती मिळाली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.