पुण्याच्या श्रुतीचा अनोखा ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’

पुण्याच्या श्रुती गावडे यांनी मोडी लिपीतून एक लाख 11 हजार 111 वेळा ‘जाणता राजा’ लिहून छत्रपती शिवाजी महाराज यांची अश्वारूढ रांगोळी साकारली. या अनोख्या उपक्रमाची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे. मोडी लिपीच्या प्रसारासाठी मागील काही वर्षांपासून श्रुती काम करत आहे.

मोडी लिपीची साक्षरता दर्शवणारा उपक्रम

आपल्या महाराष्ट्र राज्याच्या इतिहासाची गुपिते ज्या मोडी लिपीमध्ये दडली आहेत, जी भाषा शिवरायांच्या पराक्रमाची वारसा अन स्वराज्याच्या रोमहर्षक इतिहासाचे वर्णन सांगते ती मोडी लिपी, आपली भाषा कालपरत्वे अडगळीत पडते की काय असे वाटत असताना श्रुती गावडे यांचा हा उपक्रम कौतूकास्पद आहे.

…म्हणून अक्षर चकल्या बनवल्या

श्रुती गावडे या मोडी लिपीच्या प्रसार आणि प्रचारासाठी अभिनव आणि कलात्मक उपक्रम राबवत आहेत. पुण्यात हेल्मेट सक्ती झाल्यानंतर त्यांनी स्वर, व्यंजन वापरून बनवलेले हेल्मेट खूपच गाजले. त्यानंतर त्यांनी दुचाकीदेखील मोडी लिपीतून बनवली. मुलांना मोडी लिपीची गोडी लागावी, त्यांना ही लिपी समजावी यासाठी श्रुती यांनी मोडीतून अक्षर चकल्या बनवल्या. चहाचे कप, कॅलेंडर असे अनेक उपक्रम त्यांनी आजवर मोडीच्या प्रसारासाठी राबवले आहेत.

उपक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकोर्डमध्ये

यावर्षी मोडी लिपीच्या माध्यमातून शिवजयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्यासाठी श्रुती यांनी कोथरुडमध्ये नॉर्थ डहाणूकर कॉलनी, तेजस नगर येथे शिवाजी महाराजांची 1200 चौरस फुटी रांगोळी मोडी लिपीमध्ये लिहून साकारली आहे. त्यात तब्बल एक लाख 11 हजार 111 वेळा ‘जाणता राजा’ या शब्दाचा वापर करण्यात आला. या उपक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकोर्डमध्ये झाली आहे.

मोडी लिपीचा प्रसार व्हायलाच हवा

श्रुती गावडे म्हणाल्या, “सन 2016 पासून मी मोडी लिपीच्या प्रसारासाठी काम करत आहे. आपला इतिहास मोडी लिपीतून आहे. तो समजून घेण्यासाठी तसेच इतिहासाच्या पानांमध्ये रमण्यासाठी मोडी लिपी अवगत असणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दिलेल्या अनेक वारशांपैकी मोडी लिपी हा देखील एक वारसा आहे. त्यामुळे त्याचा प्रसार व्हायलाच हवा.

( हेही वाचा: कोरोनाच्या बैठकीत पंतप्रधानांनी इतर विषयांच्याच छेडल्या तारा, राऊतांचा हल्लाबोल )

वडिलांचे स्वप्न पूर्ण केले

मी करत असलेल्या कामाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी, असे माझ्या वडिलांचे स्वप्न होते. शिवजयंतीनिमित्त राबवलेल्या उपक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाल्याने वडिलांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकले याचा खूप आनंद होत असल्याचेही श्रुती गावडे यांनी सांगितले. श्रुती यांच्या आई, भाऊ तसेच आत्या माजी नगरसेविका हर्षाली दिनेश माथवड यांनी त्यांना या उपक्रमासाठी सहकार्य केले. मोडी लिपीच्या प्रसाराच्या कामासाठी ते सातत्याने मदत करतात, असेही श्रुती यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here