राज्यात संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर गाडी घालण्याचा प्रयत्न!

145

गेले कित्येक दिवस एसटी कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र शासनात विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी संप सुरू आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी पगारवाढी संदर्भात घोषणा केल्यावर काही दिवसात, प्रणित संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर यांनीही संपातून माघार घेतली. तरीही कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. अशातच, सिंधुदुर्गातील कणकवली डेपोत संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रकार घडल्यामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. या घटनेसंदर्भात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अन्यथा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करणार

संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याच्या प्रकाराने कणकवली आगारातील वातावरण तणावपूर्ण झाले आहे. सकाळी 10 वाजता सिंधुदुर्ग विभाग नियंत्रकांच्या चालकाने शिवी गाळ करत संपकरी कर्मचाऱ्यांच्या अंगावर बोलेरो गाडी  घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे. यामुळे कणकवली एसटी आगारातील कर्मचारी आक्रमक झाले आहेत. अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केलेल्या ड्रायव्हरने येऊन माफी मागावी अन्यथा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करणार असल्याचे संपकरी कर्मचाऱ्यांनी सांगितले. संबंधित घटनेची माहिती घेण्याकरिता कणकवली पोलीस घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत आहेत.

( हेही वाचा : प्रदर्शनाच्या दिवशीच का सुरू आहे ‘बॉयकॉट 83’ ट्विटर ट्रेंड? )

महाराष्ट्रात एसटीला अनन्यसाधारण महत्व

एसटीची नाळ ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याशी जोडली गेली आहे. त्यामुळे सामान्य जनतेचा विचार करून कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे असे आवाहन अनिल परब व एसटी महामंडळाकडून करण्यात आले होते. यानंतर काही भागात एसटी सेवा सुरूही झाली, तरीही सर्व कर्मचारी रूजू होईपर्यंत महामंडळाची सेवा पूर्ववत होणार नाही. अशातच अंगावर गाडी घालण्याचा प्रकार घडल्याने कर्मचाऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.