महाराष्ट्राची महती सांगणारं सिंधुताईंचं व्हायरल होणारं ‘हे’ वाक्य ऐकलंत का!

अनाथांची माय म्हणून जीवन व्यथित करणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांचे ४ जानेवारीला दीर्घ आजाराने निधन झाले. दीड हजारांहून अधिक अनाथ मुला-मुलींचे सिंधुताई संगोपन करीत होत्या. सिंधुताई सपकाळ यांना गेल्या वर्षी ‘पद्मश्री‘ने गौरवण्यात आले होते. भाषणांदरम्यान स्वतःच्या जीवनाची कर्मकहाणी सांगतानाच ऊर्दूतील शेर आणि मराठी कवितांच्या ओळी यांच्या माध्यमातून त्या मनं जिंकून घेत. असेच लाडक्या माईंना भावपूर्ण श्रद्धांजली देणारे त्यांचे अनेक जुने व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसिद्ध होत आहेत.

( हेही वाचा : हजारो अनाथांची हरपली ‘आई’! )

सिंधुताई म्हणतात…

“माझं पुस्तक दहावीच्या अभ्यासक्रमाला कर्नाटकात आहे पण महाराष्ट्रात नाही, याचं कारण या महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर मरावं लागत बाबा…, मेल्यानंतर माणसं जिथे मोठी होतात त्याचं नाव महाराष्ट्र आहे. सोन्यासारखे माणसं या मातीत गेले पण, पुन्हा नव्याने उगवले म्हणून महाराष्ट्र उभा आहे.”

महाराष्ट्रात कष्ट केल्याशिवाय तुमचं नाव मोठं होणार नाही. एकंदर या जीवनात कष्ट करूनच फलप्राप्ती होते अशी सिंधुताईंची धारणा होती. काटेरी आयुष्याशी अतूट नाते निर्माण झालेल्या माईंनी अनेकांच्या आयुष्यात फुलांचे मळे फुलवले. ‘ही ऊर्जा मला काट्यांनीच दिली. हरले असते तर सरले असते. ज्या माहेर-सासरने हाकलून दिले होते त्याच जिल्ह्यात माझा सत्कार केल्यामुळे भरून पावले. सरकारच्या मदतीशिवायही जगता येते हे माझ्या संस्थांनी दाखवून दिले आहे, असेही सिंधुताई म्हणाल्या होत्या.

अशी सुरू केली माईंनी समाजसेवा!

१९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. ममता बाल सदन संस्थेत लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते. अशी सुमारे १०५० मुले या संस्थेत राहिलेली आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here