प्रख्यात गझलकार, गायक भूपिंदर सिंह यांचे निधन

117

बॉलिवूडमधील प्रख्यात गायक आणि गझलकार भूपिंदर सिंह यांचे सोमवार, 18 जुलै रोजी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते अनेक आजारांचा सामना करत होते, त्यांना युरिनरी इन्फेक्शनही झाले होते. अखेर आज मुंबईमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. ते 82 वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधील अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यकडून श्रद्धांजली

‘आपल्या भावस्पर्शी आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा कलावंत हरपला आहे,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ गायक भूपिंदर सिंह यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहिली आहे. ‘मनाचा ठाव घेणाऱ्या आपल्या आवाजाने भूपिंदर सिंह यांनी अनेक गझल अजरामर केल्या. त्यांचा धीरगंभीर आणि भावस्पर्शी आवाज रसिकांच्या मनात कायम स्वरुपी रुंजी घालत राहील. ज्येष्ठ गायक, गझलकार भुपिंदर सिंह यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

राज्यपालांकडून श्रद्धांजली

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पार्श्वगायक भूपिंदर सिंह यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. भूपिंदर सिंह यांच्या निधनाचे वृत्त दुखद आहे. सुरेल गळा लाभलेल्या भूपिंदर सिंह यांनी अनेक अविट गोडीची गाणी व गझल गायल्या आहेत. त्यांचं संगीत अनेक वर्षे ऐकले जाईल. या दुखद प्रसंगी दिवंगत भूपिंदर सिंह यांना श्रद्धांजली वाहतो व आपल्या शोक संवेदना मिताली सिंह व इतर कुटुंबियांना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.