ऑटोइम्यून लिव्हर सिरोसिस या यकृताच्या आजाराने झगडणाऱ्या भावाला वाचवण्यासाठी बहिणीने आपल्या शरीरातील यकृताचा भाग दान केला. रक्षाबंधनाच्या उत्सवात आपल्या भावाच्यापाठी खंबीरपणे उभी राहणाऱ्या बहिणीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
राहुल पाटील या १७ वर्षांच्या तरुणाला अशक्तपणा आणि रक्ताच्या उलट्या झाल्याने कुटुंबीयांनी स्थानिक डॉक्टरांकडे त्याच्यावर उपचार सुरु केले. मात्र राहुलच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. अखेरीस राहुलला नवी मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत राहुलला ऑटोइम्यून लिव्हर सिरोसिस या यकृताच्या आजाराचे निदान झाले.
ऑटोइम्यून यकृत रोगामध्ये रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती त्याच्या स्वतःच्या यकृताच्या पेशींविरुद्ध कार्य करण्यास सुरवात करते. आजाराचे लवकर निदान झाल्यास औषधांनी उपचार करता येतात. पण राहुलच्या आजाराचे निदान उशिरा झाल्याने त्याला वारंवार रक्तस्त्राव, ओटीपोटात द्रवपदार्थ जमा होणे, कावीळ यासारख्या गुंतागुंत होत्या. त्यामुळे त्याला यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला देण्यात आला. राहुलला नव्या यकृताची गरज होती. कुटुंबियांतून राहुलची सख्खी बहीण नंदिनीने यकृतदानासाठी पुढाकार घेतला. राहूल आणि नंदिनीच्या वयात केवळ चार वर्षांचे अंतर आहे. वैद्यकीय तपासणीत राहुलची बहीण नंदिनीचे यकृत त्याच्याशी जुळले.
(हेही वाचा –Sunil Raut : राऊत बंधूंना मोठा झटका; सुनील राऊत यांच्या विश्वासू सहकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश)
रुग्णाच्या बहिणीने तिच्या आजारी भावाचा जीव वाचवण्यासाठी निर्भीडपणे तिचे यकृत दान केले. आम्ही यकृताचा आकार आणि यकृताची गुणवत्ता तपासली जी राहुलच्या आवश्यकतेशी पूर्णपणे जुळते. त्याच्यावर वेळीच उपचार न केल्याने त्याला जीव गमवावा लागला असता, अशी माहिती नवी मुंबईतील यकृत प्रत्यारोपण आणि एचपीबी शस्त्रक्रिया संचालक डॉ. विक्रम राऊत यांनी दिली.
वडील सुरक्षारक्षक म्हणून नोकरीला असल्याने प्रत्यरोपणाची महागडी शस्त्रक्रिया परवडणारी नव्हती.
रुग्णालय आणि इतर स्वयंसेवी संस्थांनी शस्त्रक्रियेच्या आर्थिक खर्चासाठी मदत केली. यकृत प्रत्यरोपणाची शस्त्रक्रिया 26 जून रोजी पार पडली. या भावंडांची कहाणी रक्षाबंधनाच्या वेळी आनंद आणि उत्सव घेऊन येईल, अशी आशा डॉ राऊत यांनी व्यक्त केली.
Join Our WhatsApp Community