मुंबईत नुकतेच पहिले छोट्या आतड्याचे प्रत्यारोपण करण्यात आले. आतड्यांच्या प्रत्यारोपणाला आता कुठे कासवगतीने वेग येऊ लागला आहे. छोट्या आतड्यांची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होऊ शकते, हे फारसे कोणाला माहित नसल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. छोट्या आतड्यांमधील झालेला बिघाड बदलता येतो, त्या जागेवर नवे आतडे बसवता येते, ही किमया आता वैद्यकीय क्षेत्रात प्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. रुग्णाला नवी संजीवनी देणा-या छोटे आतडे प्रत्यारोपण शस्त्रक्रियेविषयीची माहिती…
( हेही वाचा : तुमचा Call कोणी रेकॉर्ड तर करत नाही ना? कसे ओळखाल )
छोटे आतडे खराब होण्याची कारणे
- शरीरातून छोट्या आतड्यांना रक्त पुरवठा खंडित होणे, छोट्या आतड्यांत गँगरीनसारखा भयावह संसर्ग होणे आदी समस्या उद्भवल्या की, छोटे आतडे निकामी होते.
- उच्च रक्तदाब, मधुमेह, धुम्रपान, कोलेस्ट्रोल नियंत्रणात नसणे या कारणांमुळे छोटे आतड्यांची कार्यक्षमता बिघडायला सुरुवात होते.
आवश्यक तपासण्या
छोट्या आतड्यांची कार्यक्षमता पाहण्यासाठी कोणतीही विशेष चाचणी अद्याप उपलब्ध नाही. पोटात खूप दुखल्यानंतर डॉक्टरांकडून सीटी स्कॅन करण्याचा दिला सल्ला गेल्यास, छोट्या आतड्यांच्या कार्यक्षमतेविषयी माहिती मिळते. छोटे आतडे निकामी झाल्याचे निदान होताच प्रत्यारोपणासाठी संबंधित झोनल ट्रान्सप्लान्ट कोर्डिनेशन कमिटीकडे (झेडटीसीसी) नोंदणी करता येते. मात्र याविषयी फारशी माहिती नसल्याने रुग्ण प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी फारसा पुढाकार घेत नाहीत. मुंबईत अजूनही एक रुग्ण छोट्या आतड्याच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी प्रतीक्षा यादीत आहे.
प्रत्यारोपण शस्त्रक्रियेविषयी
मृत रुग्णाच्या कुटुंबीयांनी अवयव प्रत्यारोपणासाठी संमती दिल्यानंतर आवश्यक चाचण्यानंतर छोडे आतडे अवयवदानासाठी वापरले जाते. सहा तासांच्या आत नव्या आतड्यांसाठी प्रतीक्षेत असलेल्या रुग्णावर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होणे आवश्यक असते. प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी तब्बल सहा तासांचा कालावधी लागतो.
राज्यात आतापर्यंत सातवेळा छोटे आतडे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. सातही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ग्लोबल रुग्णालयाचे ट्रान्सप्लान्ट सर्जन डॉ. गौरव चौबल आणि त्यांच्या टीमने पार केले आहे. त्यापैकी पुण्यात ६, ठाण्यात ज्युपिटर रुगालयात एक आणि परळ येथील ग्लोबल रुग्णालयात मुंबईतील पहिला छोटे आतडे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया गेल्या आठवड्यात पार पडली.
प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतरची आवश्यक काळजी
प्रत्यारोपण शस्त्रकियेनंतर रुग्ण आठवडाभर अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या देखरेखीखाली असतो. त्यानंतर आठवडाभर नॉर्मल वॉर्डमध्ये रुग्णाला उपचार दिले जातात. डिस्चार्जनंतरही रुग्णाला औषधांचा कोर्स नियमित पाळणे बंधनकारक असते. तब्बल दीड महिना रुग्णाला डाएटचे काटेकोर पालन करावे लागते.
Join Our WhatsApp Community