सापळा लावला रानडुक्करासाठी, अडकली वाघीण

126
रानडुक्करांना पकडण्यासाठी लावलेल्या फाशामध्ये अडकून वाघीण जखमी झाल्याची घटना नागपूरच्या पेंच व्याघ्र प्रकल्पात घडली. वाघिणीने स्वतःहूनच फाश्यातून आपली मुक्तता केली. फाश्यातून  निघताना गळ्यात अडकलेला सापळा काढून तिला उपचार देण्यासाठी तिने वनाधिकाऱ्यांना महिनोनमहिने आपल्यामागे फिरवले. अखेर जंगलात मुक्त संचार करतच तिची जखम सुकून बरी झाल्याचे पाहताच वनाधिकाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

काय आहे नेमके प्रकरण 

अंदाजे पाच वर्षाच्या टी 41 या वाघिणीच्या गळ्यात सापळा अडकल्याचे, कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून जंगलातील वन्यजीवांच्या हालचालींवर लक्ष ठेवताना वनाधिकाऱ्यांच्या लक्षात आले. ही घटना 26 जानेवारी रोजी वनाधिकाऱ्यांच्या लक्षात आली. फाश्यातून निसटण्याच्या धडपडीत तिच्या गळ्याला जखम झाली, सापळ्याची तार टी 41च्या मानेत राहिली.
वाघीण दिसलेल्या जागेपासून माईकेपार हे गाव एक किलोमीटरवर होते. या गावात शिकाऱ्यांनाही वनविभागाने पकडले होते. त्यामुळे वाघिणीचा शोध घेण्यासाठी ६० कॅमेरा ट्रेप्स, वनाधिकारी आणि विशेष व्याघ्र प्रकल्प टीम यांची तब्ब्ल अकरा पथके तयार केली गेली. गावकऱ्यांना सतर्क करण्यासाठी वनसमितीचे सदस्य, पोलीस पाटील आणि लगतच्या गावांचे सरपंच यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला गेला.

वाघीण पकडण्याचे अडथळे 

वाघीण टी ९६ या वाघासोबत सतत लांबचे जंगलातील अंतर पार करत होती. पेंचमधील नागलवाडी, सालेघाट आणि पश्चिम पेंच पर्वतरांगांमध्ये तिचा संचार सुरु होता. जंगलातल्या या खडबडीत भूभागावर वाघिणीला बेशुद्द करून पकडणे अवघड होते.
गळ्यातील तार आपोआप निघाली 
१७ रोजी पुन्हा कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून वाघिणीची सापळ्यातून सुटका झाल्याचे समोर आले. तिच्या मानेवर जखमा असल्याने वनाधिकारी तिच्यावर लक्ष ठेवून होते. १६ एप्रिल रोजी कॅमेरा ट्रॅपमधील छायाचित्रात वाघिणीची मान बरी झाल्याचे आणि वाघीण तंदुरुस्त असल्याचे दिसले. तिची काळजी घेण्यासाठी धडपडणाऱ्या वनाधिकाऱ्यांना तिने चार महिन्यात आपल्यामागोमाग १ हजार ५०० किलोमीटरपेक्षाही जास्त फिरवले.

गस्तीचे पथक 

सहाय्यक वनसंरक्षक किरण पाटील, व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे सहाय्यक वनसंरक्षक अनिल परब, अतुल देवकर, वन परिक्षेत्र अधिकारी विशाल चव्हाण, विजय कदम, विजय सूर्यवंशी आणि पशुवैद्यक डॉ. चेतन पाथोंड आणि ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरचे अधिकारी.
सापळा रानडुक्कर अथवा लहान वन्यप्राण्यांला पकडण्यासाठी लावला होता. त्यात वाघीण अडकली होती. सापळा लहान तारांचा असल्याने, तो निघाला असून याबाबत तपास सुरु आहे. -डॉ. प्रभुनाथ शुक्ल, उपवनसंरक्षक, पेंच व्याघ्र प्रकल्प
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.