वनविभागाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे परिसरात अजगराची शेपटी कापून त्याला मांडूळ बनवून विकण्याची घटना ताजी असतानाच सापांच्या रेस्क्यूच्या नावाखाली राज्यभरात पसरलेल्या बोगस सर्पमित्रांना आळा घालण्यात अद्यापही वनविभागाला यश आलेले नाही. वनविभागाचे अधिकृत ओळखपत्र नसतानाही कित्येक स्वयंघोषित सर्पमित्र संघटनेच्या नावानं ओळखपत्र बनवून लोकांकडून पैसे उकळत आहेत. याप्रकरणी वनविभाग सक्त कारवाई कधी करणार, अशी विचारणाही होत आहे.
राज्यभरात बोगस सर्पमित्रांचा सुळसुळाट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पालिकेच्या भाभा रुग्णालयाजवळील खासगी रुग्णवाहिकेत अजगर ठेवून त्याची विक्री करण्यात येणार होती. हा प्रकार पोलिस कंट्रोल रुमला निनावी फोन करणा-या माणसाकडूनच झाला असावा, असा दाट संशय आहे. त्यानंतर रुग्णवाहिकेत अजगर ठेवून पोलिसांना फोन केल्याचं बोललं जातंय. मात्र सापांच्या रेस्क्यूबाबत वनविभागाशी संपर्क न ठेवता बेकायदेशीररित्या नियमांचं उल्लंघन करत खोटी ओळखपत्रे बनवून राज्यभरात बोगस सर्पमित्रांचा सुळसुळाट सुरु आहे. अहमदनगरमधील बोगस सर्पमित्र आकाश जाधव यांच्या युट्यूब चॅनलवर बंदी घालण्यात अद्यापही वनविभागाला अपयश आलंय. काही दिवसांपूर्वीच आकाश जाधव यांनी ‘आखिर कांट ही लिया इस सांप ने, साप के डर से किसानों ने खेत मे काम करना ही बंद किया’ या शीर्षकासह युट्यूब चॅनलवर व्हिडिओ पोस्ट केलाय.
वांद्र्यातील घटनेबाबत वनसंरक्षकच अनभिज्ञ
विदर्भात कार्यालयीन कामानिमित्त असल्यानं मला वांद्रे येथील घटनेबाबत अद्याप माहिती नाही. साहाय्यक वनसंरक्षकांनी याबाबत लेखी माहिती दिलेली नाही. माहिती घेतल्यानंतरच अधिकृतरित्या बोलता येईल, असे ठाणे प्रादेशिक वनविभाग, मुख्यवनसंरक्षक, एस. रामाराव म्हणाले. त्यांचे कार्यक्षेत्र मुंबई ते रायगडपर्यंतचा प्रादेशिक भाग ठाणे प्रादेशिक वनविभागाअंतर्गत मोडला जातो.
(हेही वाचा या क्रिकेटपटूच्या खात्यावर ‘असा’ पडला दरोडा!)
मुंबईतील बोगस सर्पमित्राची कारवाई
जुलै २०२१ रोजी हसमुख वळुंज या व्यक्तीवर ठाणे वनविभागानं गुन्हा नोंदवलाय. हसमुख यांनी वनविभागाच्या नावानं बोगस ओळखपत्र बनवल्याचं निदर्शनास आल्यानंतर तत्कालीन मुंबईचे वनक्षेत्रपाल संतोष कंक यांनी मुलुंड पोलिस ठाण्यात हसमुख विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर मुंबईत प्राण्यांचं रेस्क्यू करणा-या वनविभागाच्या संपर्कातील प्राणीमित्र संघटनांनी पत्र जाहीर करुन हसमुख आपल्या संस्थेत काम करत नसल्याचं जाहीर केलंय.
मानद वन्य जीवरक्षकांची मागणी
वनविभागानं बोगस सर्पमित्रांविरोधात, त्यांच्यावर अद्यापही अपेक्षित कडक कारवाई करताना दिसत नाही. कारवाई जितकी कडक तितकाच अशा प्रकरणांना लवकरात लवकर आळा बसेल, असे मानद वन्यजीव रक्षक सुनीश कुंजू म्हणाले.
आकाश जाधववर चौकशीनंतर कारवाई
अहमदनगरमधील स्वयंघोषित सर्पमित्र आकाश जाधव यांच्याविरोधात चौकशी सुरुय. चौकशी दोन आठवड्यांत पूर्ण होईल, त्यानंतरच कारवाईचं स्वरुप ठरेल, असे अहमदनगर प्रादेशिक वनविभागाचे उपवनसंरक्षक, सुवर्णा माने म्हणाले.
Join Our WhatsApp Community