नाशिक येथे सामाजिक कार्य करणाऱ्या, नाट्यक्षेत्रात आपली अभिनयाची कला जोपासत रंगभूमीवर विविध भूमिका साकारणाऱ्या भानुमती घाटपांडे यांचे गुरुवार, १९ जानेवारी रोजी वयाच्या ९६व्या वर्षी निधन झाले. ‘स्वातंत्र्यकवी गोविंद यांची कविता’ या पुस्तकाच्या पाचव्या आवृत्तीच्या प्रकाशनाच्या वेळी भानुमती घाटपांडे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला दीड लाख रुपयांची देणगी दिली होती.
भानुमती घाटपांडे यांचा अल्प परिचय
२७ जुलै १९२७ रोजी अहमदनगर येथील जिनसीनाले जहागिरदार घराण्यात भानुमती घाटपांडे यांचा जन्म झाला. त्यांचे शालेय शिक्षण अहमदनगर येथील सरकारी मुलींच्या शाळेत झाले. त्यांचा विवाह प्रभाकर घाटपांडे यांच्याशी झाला. पुढील ३६ वर्षे इंडिया सिक्युरिटी प्रेस, नाशिक रोड येथील सरकारी निवासस्थानात त्यांचे वास्तव्य होते. त्यांनी सिक्युरिटी प्रेसमध्ये भगिनी मंडळाची स्थापना करून विविध पदे यशस्वीपणे सांभाळली. त्यानंतर नाशिक जिल्हा भगिनी मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी ४ वर्षे सांभाळली. अखिल भारतीय महिला परिषदेच्या ‘चाइल्ड वेल्फेअर’ सब कमिटीचे सदस्य होण्याचा बहुमान त्यांना प्राप्त झाला होता. शालेय जीवनापासून अभिनयाची आवड असल्याने त्यांनी बऱ्याच नाटकातून विविध भूमिका साकारल्या. महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवातील नाटकात यशस्वी सहभाग घेतला. पती प्रभाकर घाटपांडे यांच्यासोबत त्यांनी जगाचा प्रवास केला. त्यावर आधारित ‘घे भरारी मानवा – रम्य ही वसुंधरा’ हे पुस्तक लिहिले. विविध सामाजिक संस्थांना त्यांनी उदारपणे आर्थिक मदत केली.
Join Our WhatsApp Community