राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्रिसदस्यीय समितीने दिलेल्या अहवालामुळे एसटी कर्मचारी निराशा झाले होते. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे निर्देश राज्य सरकारला दिल्यावर विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बडतर्फ कामगारांसह सर्व संपकरी कामगारांनी कामावर रुजू व्हावे, त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, अशी घोषणा केली. त्यासाठी या कर्मचाऱ्यांना ३१ मार्चपर्यंत मुदत दिली आहे.
( हेही वाचा : गुढीपाडव्याच्या दिवशी राज्याला मिळणार ‘ही’ खुशखबर! काय म्हणाले आरोग्यमंत्री? )
हळूहळू एसटी सेवा पूर्ववत
अजित पवारांनी दिलेल्या अल्टिमेटममुळे सोलापुरात ३१ मार्चच्या आधी ४२ कर्मचाऱ्यांनी पुन्हा एसटी आगार गाठले आहे. यात १५ चालक तर २७ वाहकांचा समावेश आहे. कर्मचारी वर्ग कामावर परतत असल्यामुळे सोलापुरात दैनंदिन प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आता हळूहळू एसटी सेवा पूर्ववत होण्यास सुरुवात झाली आहे.
सोलापुरात ४२ कर्मचारी कामावर हजर
गेल्या दोन दिवसांत सोलापुरात ४२ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. यामुळे ज्या मार्गावर चालक नसल्यामुळे गाड्या बंद होत्या. त्या मार्गावर गाड्या सुरू होण्याचे प्रमाण वाढले आहे. आता सर्व मार्गांवर एसटी सुरू करण्यात येतील, अशी माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे. आता दोन दिवस राहिले आहेत. त्यामुळे एकूण कर्मचाऱ्यांपैकी किती जण सेवेत येतील आणि संपाचे भवितव्य काय हे स्पष्ट होईल.
Join Our WhatsApp Community