चेंबूर आणि माहुल, ट्रॉम्बे येथील गवाणपाडा आदी परिसरात दर पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्याची समस्या कायम असून अखेर येथील तुंबणाऱ्या या पाण्यापासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. चेंबूरमधील विविध नाल्यांचे तसेच गव्हाणपाडा नाल्याचे आता रुंदीकरण करून वळवण्याचे काम महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात येत आहे. त्यामुळे पुढील पावसाळ्यात या तुंबणाऱ्या पाण्यापासून चेंबूर आणि माहुल, ट्रॉम्बेमधील रहिवाशांची सूटका होणार आहे. पावसाळ्यातील हा मोठा त्रास कमी होणार आहे.
पुनर्बांधकाम केले जाणार
पूर्व उपनगरातील चेंबूरमधील, माहुल, ट्राॅम्बे परिसरात तुंबणाऱ्या पाण्यासंदर्भात महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात येथील काही नाल्यांचे रुंदीकरण करून वळवण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यानुसार महापालिकेने ट्राॅम्बे येथील गवाणपाडा नाल्याचे रुंदीकरण, खोलीकरण तसेच वळवण्याचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या अरुंद असलेल्या या नाल्यातून प्रवाहाने पाणी वाहून जात नसल्याने पाणी तुंबले जाते. त्यामुळे पाणी प्रवाहाची क्षमता वाढवण्याच्या दृष्टीकोनातून ही कामे केली जाणार आहे. यासाठी गव्हाणपाडा रिफायनरी बस स्टॉपपासून ते भिकाजी दामाजी पाटील रस्ता येथील भारत पेट्रोलियम रिफायनरीच्या कंपाऊंड भिंती पर्यंतच्या या गव्हाणपाडा नाल्याचे पुनर्बांधकाम करण्यात येणार आहे. याशिवाय चेंबूर येथील पूराला कारणीभूत असलेल्या विविध नाल्यांचे रुंदीकरणासह पुनर्बांधकाम केले जाणार आहे.
( हेही वाचा :महाविकास आघाडीने केली इतिहासातली सगळ्यात मोठी वीज दरवाढ )
इतका खर्च केला जाणार
या सर्व कामांसाठी सुमारे चार कोटी रुपये खर्च केला जाणार असून, या कामांसाठी शंखेश्वर एंटरप्रायझेस या कंपनीची निवड करण्यात आली आहे. स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्तावांना मंजुरी देण्यात आल्याने या कामांनाही सुरुवात होत आहे.
Join Our WhatsApp Community