२००८ साली देशात सर्वप्रथम ओरिसा राज्यात विणीच्या हंगामात किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी आलेल्या ऑलिव्ह रिडले कासवांना सॅटलाईट टॅगिंग करुन त्यांचा भ्रमणमार्ग शोधण्याचा पहिला प्रकल्प राबवण्यात आला होता. दोन वर्षानंतर या प्रकल्पाच्या माध्यमातून भारतीय वन्यजीव संस्थेच्या शास्त्रज्ञांनी ऑलिव्ह रिडले कासवांच्या समुद्रभ्रमंतीमधील वेगवेगळ्या रंजक गोष्टी समोर आणल्या होत्या. त्याच धर्तीवर यंदाच्या वर्षापासून महाराष्ट्रात वनविभागाच्या कांदळवन कक्षाने भारतीय वन्यजीव संस्थेच्या साहाय्याने पाच मादी ऑलिव्ह रिडले कासवांवर सॅटलाईट टॅगिंग बसवून ट्रान्समीटरच्या साहाय्याने माहिती घेण्याचा सुरु केलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात सातत्याने बाधा येत आहेत. परंतु समुद्रात यथेच्छ संचार करणाऱ्या समुद्री जीवांना शोधणे आणि मागोवा घेणे अशक्यप्राय गोष्ट असते. त्यामुळे संपर्क तुटल्यानंतर पुन्हा ‘त्या’ कासवाला शोधणे कठीणच असते, अशी माहिती भारतीय वन्यजीव संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ आर राकेशकुमार देतात.
( हेही वाचा : हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवास होईल भरभर! होणार ‘हे’ महत्वाचे बदल)
समुद्रभ्रमंतीची माहिती ट्रान्समीटरच्या साहाय्याने
ओरिसा राज्यातही सॅटलाईट टॅगिंगच्या माध्यमातून ट्रान्समीटरमधील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला होता. या भागांतील तब्बल ६५ ऑलिव्ह रिडले कासवांच्या पाठीवर सॅटलाईट टॅगिंग बसवले गेले. त्यापैकी ३० ऑलिव्ह रिडले कासवांचा संपर्क तुटला. एक विणीचा काळ लोटल्यानंतर ६५ ऑलिव्ह रिडले कासवांपैकी केवळ ७ ते ८ ऑलिव्ह रिडले कासव पुन्हा ओरिसा किनारपट्टीवर परतले. संपर्क तुटलेल्या प्रत्येक ऑलिव्ह रिडले कासवाचा मृत्यूच झाला हे गृहित धरणे शक्य नाही. मासेमारीच्या जाळ्यात अडकल्याने, जहाजाच्या धडकेने किंवा ट्रान्समीटरच्या बिघाडाने ३० ऑलिव्ह रिडले कासवांचा संपर्क तुटल्याचा केवळ अंदाज आपण बांधू शकतो, असे डॉ आर.राकेशकुमार सांगतात. त्यापैकी २ ऑलिव्ह रिडले कासवांनी तब्बल दोन वर्षांच्या समुद्रभ्रमंतीची माहिती ट्रान्समीटरच्या साहाय्याने आम्हांला दिली. या प्रकल्पासाठी तसेच महाराष्ट्रातील ऑलिव्ह रिडले कासवांच्या प्रकल्पासाठी ट्रान्समीटर बनवणारी कंपनी सारखीच होती. दोन्ही ठिकाणी न्यूझीलंड देशातील सीरट्रॅक कंपनीकडूनच ट्रान्समीटर खरेदी केले गेले होते.
पावसाळ्यात ऑलिव्ह रिडले कासवांमधील होणारे बदल महत्त्वाचे
बारा वर्षांपूर्वी सीरट्रॅक कंपनीने जुने व्हर्जन ओरिसातील प्रकल्पासाठी वापरले होते. यंदा अत्याधुनिक व्हर्जनच्या साहाय्याने बनवलेले ट्रान्समीटर्स महाराष्ट्रातील ऑलिव्ह रिडले प्रकल्पासाठी वापरले गेले. ओरिसातील ऑलिव्ह रिडले कासवांच्या सॅटलाईट टॅगिंग प्रकल्पातून मोठमोठ्या रंजक माहित्या समोर आल्या होत्या. महाराष्ट्रातील पाच पैकी तीन मादी ऑलिव्ह रिडले कासवांचा संपर्क तुटला असला तरीही आम्हांला ब-यापैकी माहिती मिळाली आहे. पाचपैकी रेवा आणि वनश्री या मादी ऑलिव्ह रिडले कासवांकडून हिवाळ्यात नवा विणीचा हंगाम सुरु होईपर्यंत ट्रान्समीटरच्या माध्यमातून माहिती मिळायला हवी, अशी आशा व्यक्त केली जात आहे. आता कुठे पावसाळा सुरु झाला आहे, पावसाळ्यात ऑलिव्ह रिडले कासवांमधील बदल टिपायचे आहेत. कोणत्याही विदारक परिस्थितीत रेवा आणि वनश्रीकडून सिग्नल मिळणे बंद होऊ नये, अशी आशा शास्त्रज्ञांना आहे.
Join Our WhatsApp Community