गल्लीबोळातूनही ‘फायर’ बाईकवरून पोहोचणार जवान

103

मुंबईत दाटीवाटीने वसलेल्या वस्त्या आणि चिंचोळे रस्ते बघायला मिळतात. यामुळे बऱ्याचदा टोलेजंग इमारतींसह झोपडपट्या आणि अनेक भागांमध्ये लागणाऱ्या आगीच्या दुघर्टनेच्यावेळी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे कित्येकदा समोर आले आहे. यावर मात करण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाच्यावतीने २४ फायर बाईक्स खरेदी करण्यात येत आहे. यापूर्वी ५ फायर बाईक्स खरेदीचा प्रस्ताव अग्निशमन दलाने तयार केला होता. परंतु तीन वर्षांपूर्वी हाच प्रस्ताव केवळ एकमेव कंपनी असल्याचा दाखला देत स्थायी समितीने फेटाळून लावला होता. पण आता २४ बाईक्स खरेदीसाठी मागवलेल्या निविदेतही एकमेव कंपनीच असल्याने समिती आता काय निर्णय घेणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

कोणत्याही आपात्कालिन परिस्थितीमध्ये दुघर्टनेच्या ठिकाणी पोहोचण्यास लागणारा वेळ अत्यंत महत्वाचा असतो. आगीच्या दुघर्टनेच्या ठिकाणी कमीत कमी वेळेत पोहोचल्यास आगीवर प्रारंभिक स्तरावरच नियंत्रण मिळवता येते. त्यामुळे आगीचा मोठा भडका झाल्यानंतरही नागरिकांच्या जीविताची व वित्ताची मोठी हानी टाळता येऊ शकते. तसेच आग विझवण्याचे कार्य कमीत कमी वेळेत प्रतिसाद प्राप्त झाल्यास जीवित हानी टाळण्यास मदत होते. हा प्रतिसादात्माक वेळ कमी करण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाने फायर बाईक्स विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

२४ बाईक्स खरेदी करण्याचा निर्णय

मुंबईची मागील काही दशकांमध्ये वाढ झाली असून या वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाहनांचीही संख्या वाढली आहे. परिणामी रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यातच मुंबईत मोठ्या संख्येने झोपडपट्टी वस्त्यांही वाढल्या असून या वस्त्यांमधील रस्ते चिंचोळे व दाटीवाटीचे असल्याने तिथे पोहोचण्यास फायर बाईक्स महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे मुंबई अग्निशनम दलाने २४ फायर बाईक्स ५ वर्षांच्या सर्व सामावेशक सेवा देखभाली कंत्राट देण्यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये केवळ एकमेव ‘फॉरक्युवर रेस्क्यू’ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पात्र ठरली आहे. या कंपनीने ११ लाख ५१ हजार रुपये आणि दोन वर्षांचा हमी कालावधीसह पाच वर्षांच्या देखभालीसाठी १ लाख १८ हजार याप्रमाणे एकूण १२ लाख ६९ कोटी याप्रमाणे २४ बाईक्ससाठी एकूण ३ कोटी १५ लाख ६० हजार ९६० रुपयांना बोली लावली आहे. त्यामुळे या कंपनीकडून या दरात २४ बाईक्स खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

(हेही वाचाः अडचण वाढली! एनसीबीच्या समीर वानखेडेंची विभागीय चौकशी)

यापूर्वी जानेवारी २०१८ मध्ये अशाप्रकारे फायर बाईक्सकरता अग्निशमन दलाने निविदा मागवल्या होत्या. यामध्ये पाच बाईक्स खरेदी करण्याचा प्रस्ताव समितीपुढे सादर करण्यात आला होता. त्यावेळी पाच वर्षांच्या देखभालीसह एका बाईकची किंमत त्यावेळी १३ लाख ७० हजार एवढी होती. त्यामुळे पाच बाईक्ससाठी ७१ लाख २७ हजार ८२२ रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीला आला असता जून २०१८ मध्ये समितीने हा प्रस्ताव दप्तरी दाखल करत फेरनिविदा मागवण्याचे निर्देश दिले होते. प्रस्ताव दप्तरी दाखल करताना समितीने एकमेव कंपनी असल्याचे कारण पुढे केले होते. परंतु आता २४ बाईक्स खरेदी करण्यासाठी मागवलेल्या निविदेत एकमेव कंपनीनेच भाग घेतला आहे. ही एकमेव कंपनी पात्र ठरल्याने पुन्हा समिती हेच कारण देत प्रस्ताव पाठवणार का असा सवाल उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे मागील निविदेमध्ये ज्या पाच बाईक्सची खरेदी करता जो दर आकारला होता, त्यातुलनेत आता जी बोली लावली आहे, त्यामध्ये तब्बल एक लाखांचा दर कमी आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.