सलग दुसऱ्या दिवशी नैऋत्य मोसमी वारे विदर्भातील अजून काही भागातून माघारी फिरल्याचे शुक्रवारी वेधशाळेने जाहीर केले. मान्सून चंद्रपूर आणि गडचिरोलीतील उर्वरित भागासह यवतमाळ जिल्ह्यातील काही भागातून परतला. गेल्या पाच दिवसांत ठाणे, मुंबई परिसरातही पाऊस गायब आहे. त्यामुळे 48 तासांत उत्तर कोकणातून मान्सून परतण्याचे दाट संकेत आहेत.
कुठे कधीपासून पाऊस परतणार?
केंद्रीय वेधशाळेच्या अंदाजानुसार, पुढच्या 48 तासांत संपूर्ण देशभरातून मान्सून माघारी परतेल. मात्र पुढच्या आठवड्यातही दक्षिण भारतात पावसाचा अंदाज असल्याने वेधशाळाच गोंधळात पडल्याचे दिसून येत आहे. केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यात अजून दोन दिवस परतीचा पाऊस सुरु राहील. रविवारपासून उत्तर कर्नाटकात पावसाची गैरहजेरी राहील. त्यानंतर या भागात कोरडे वातावरण राहील. तामिळनाडू, दक्षिण कर्नाटक आणि केरळ राज्यात मंगळवारपर्यंत पाऊस सुरु राहील, असा अंदाज खुद्द केंद्रीय वेधशाळेने दिलेला असताना 48 तासांत संपूर्ण देशभरातून पाऊस जाण्याच्या स्वतःच्याच अंदाजाला वेधशाळेने गोंधळात टाकल्याचे दिसून येत आहे.