नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी दोन दिवसाच्या प्रतीक्षेनंतर मध्य महाराष्ट्रातील काही भागासह आज मराठवाड्यात प्रवेश केला. मान्सून राज्यातील नंदुरबार, जळगाव आणि परभणीपर्यंत पोहोचल्याचे भारतीय वेधशाळेने जाहीर केले. येत्या ४८ तासात मान्सून विदर्भात प्रवेश करेल, असा अंदाजही वेधशाळेने दिला आहे. शनिवारी मान्सूनने वेंगुर्ल्यापाठोपाठ थेट मुंबई, पुणे ते थेट मध्य भारतातील इतर भागापर्यंत मजल मारली. राज्याच्या इतर भागात वावटळीसह पूर्वमोसमी पावसाची हजेरी सुरु आहे. मान्सूनने गुजरात राज्यतही प्रवेश केला, दोन दिवसांत मान्सूनचा मध्य भारतातील काही भागातही प्रवेश करेल, असेही भारतीय वेधशाळेने जाहीर केले.
(हेही वाचा – “गेल्या 8 वर्षांत ईशान्य भारतातील प्रदेशांची अभूतपूर्व प्रगती”)
यंदाच्या जूनमधील अपेक्षित पावसाबाबत होतोय बदल
यंदाच्या पावसात मान्सूनच्या आगमनाबाबत वरुणराजाची वक्रदृष्टीच असल्याचा भास होत असताना मुळात किती पाऊस पडणार या कोड्यात भारतीय वेधशाळेने मोठा बदल केला आहे. गेल्या ४९ वर्षांच्या पावसाच्या कामगिरीचा अभ्यास करत संपूर्ण देशभरातील पावसाच्या प्रत्येक महिन्यातील सरासरी पावसाच्या आकडेवारी आता वेधशाळेने बदल केला आहे. या आधारावर जून महिन्यात गेल्या वर्षांपर्यंत अपेक्षित असणारा पाऊस वेगवेगळ्या ठिकाणी कमी किंवा जास्त दिसून येईल. पावसाचे बदलते पॅटर्न किंवा वातावरणीय बदल या घटकांमुळे दर महिन्यातील अपेक्षित पावसाच्या कामगिरीत हा बदल करण्यात आल्याची माहिती वेधशाळा अधिका-यांनी दिली.
मुंबईतील अद्यायावत बदल तयार
प्रत्येक महिन्यातील अपेक्षित पावसाळा व तापमान या घटकांत दर दहा वर्षांनी बदल केला जातो. देशभरातील सुमारे ४०० वेधशाळेकडून नियंत्रित स्थानकांची माहिती आता अद्यायावत केली जात आहे. प्रामुख्याने मोठ्या शहरांतील माहिती अद्यायावत करण्याचे काम सुरु असून, मुंबईतील अद्यायावत बदल तयार झाले आहेत. मोठ्या शहरातील माहिती अद्यायावत करणे हा पहिला प्रमुख टप्पा जवळपास पूर्ण झाला आहे. दुस-या टप्प्यातील काम वेगाने सुरु असून येत्या दोन महिन्यात देशभरातील प्रमुख स्थानकांतील दर महिन्याची पावसाची आणि तापमानाची तसेच इतर आवश्यक घटकांची माहिती अद्यायावत केली जाईल.