दोन दिवसांपूर्वी केरळमध्ये दाखल झालेल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी पुढील वाटचाल करत कर्नाटक राज्यांत प्रवेश केला. कर्नाटकासह तामिळनाडू राज्यातील काही भाग आणि बंगालच्या उपसागरांतील बराचसा भाग नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी व्यापला. मान्सूनला पुढे सरकण्यास पोषक वातावरण असल्याने येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सून थेट कोकणापर्यंत पोहोचेल, अशी माहिती भारतीय वेधशाळेचे महासंचालक डॉ. मृत्यूंजय मोहापात्रा यांनी दिली.
( हेही वाचा : ठाण्यातील या भागात २४ तास पाणी पुरवठा राहणार बंद)
मध्य महाराष्ट्रातील कमाल तापमानात किंचित घट
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज नैऋत्य मोसमी वारे पुढे सरकले. केरळचा उर्वरित भाग व्यापत वरुणराजाने थेट गोव्याच्या वेशीपर्यंत प्रवेश केला. आंध्रप्रदेश, तामिळनाडू, केरळ तसेच तेलंगणा राज्यात सध्या पावसाचा जोर वाढला आहे. अरबी समुद्रातील वाऱ्यांच्या चक्राकार स्थितीमुळे समुद्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. या प्रभावामुळे येत्या दोन दिवसानंतर कोकणात पावसाचा जोर वाढू शकतो. सोमवारी दक्षिण कोकण आणि बीड जिल्ह्यांत पावसाचा मारा सुरु होता. पूर्वमोसमी वातावरणामुळे मध्य महाराष्ट्रातील कमाल तापमानात किंचित घट झाली आहे. त्या तुलनेत विदर्भातील कमाल तापमान ४० अंशापुढे कायम आहे. परंतु विदर्भात आता उष्णतेच्या लाटांचा प्रभाव आता दिसून येणार नाही, अशी माहिती वेधशाळा अधिका-यांनी दिली.
पूर्वमोसमी पावसाचा अंदाज
विदर्भ वगळता १ जून रोजी राज्यात सर्वत्र पूर्वमोसमी पाऊस येईल. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात शुक्रवारपर्यंत पूर्वमोसमी पावसाची मेघगर्जनेसह हजेरी राहील. मराठवाड्यात गुरुवारी एक दिवस पूर्वमोसमी पावसाला ब्रेक राहील, असा अंदाज भारतीय वेधशाळेने जाहीर केला.
Join Our WhatsApp Community