दिल्लीच्या धर्तीवर मुंबईत ‘विशेष पोलीस आयुक्त’ हे नवीन पद निर्माण करण्यात आले आहे. राज्याच्या गृह विभागाने बुधवारी १९९४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती हे गुरुवारी या पदाचा कार्यभार हाती घेणार आहेत. मुंबई पोलिसांच्या इतिहासात प्रथमच राज्य सरकारने विशेष मुंबई पोलिस आयुक्तपदाची निर्मिती केली आहे. विशेष पोलीस आयुक्त हे मुंबई पोलीस आयुक्तांच्या अधिपत्याखाली असणार आहेत. मुंबई पोलीस दलातील सर्व पोलीस सहआयुक्त हे विशेष पोलीस आयुक्तांना रिपोर्ट करतील आणि विशेष पोलीस आयुक्त हे पोलीस आयुक्तांना रिपोर्ट करतील असे गृह विभागाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे.
( हेही वाचा : मिशन चांद्रयान ३! इस्त्रोची तयारी पूर्ण, काही महिन्यांत लॉंचिंग)
दिल्ली पोलीस दलात पूर्वीपासून दोन विशेष पोलीस आयुक्त असून या दोन विशेष पोलीस आयुक्तांकडे कायदा व सुवव्यस्था आणि तपास ही जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या इतिहासात प्रथम मुंबईला विशेष पोलीस आयुक्तांची निर्मिती करण्यात आली आहे, या पदावर राज्याच्या गृहविभागाने वरिष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची नियुक्ती केली आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजता देवेन भारती हे मुंबई पोलीस मुख्यालयातील पोलीस आयुक्त इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील पोलीस आयुक्तांच्या जुन्या कार्यालयात आपला पदभार स्वीकारतील.
राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, प्रशासकीय गरज म्हणून पोलीस आयुक्त, मुंबई यांच्या अधिपत्याखाली पोलीस सहआयुक्तांच्या कामावर अधिक प्रभावीपणे देखरेख ठेवण्यासाठी ‘अपर पोलीस महासंचालक’ दर्जाच्या पदाची आवश्यकता विचारात घेऊन, “विशेष पोलीस आयुक्त” हे पद निर्माण करण्यात आले आहे. गृह विभागाच्या आदेशानुसार गुन्हे, कायदा व सुव्यवस्था, आर्थिक गुन्हे, प्रशासन या विभागाचे सहपोलीस आयुक्त हे विशेष पोलीस आयुक्तांना रिपोर्ट करतील आणि विशेष पोलीस आयुक्त हे पोलीस आयुक्तांना रिपोर्ट करतील.
१९९४ बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले देवेन भारती यांना यापूर्वी मुंबई पोलीस दलात सहपोलीस आयुक्त म्हणून कायदा व सुव्यवस्था, आर्थिक गुन्हे शाखा, अपर पोलीस आयुक्त गुन्हे या पदावर नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना पदोन्नती देण्यात आली व महाराष्ट्र एटीएसचे प्रमुखही करण्यात आले होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात देवेन भारती यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. मुंबईतील काही हाय-प्रोफाइल प्रकरणांसह शहरातील काही महत्त्वाच्या तपासांमध्ये देवेन भारती यांचा समावेश होता. २६/११चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला, मिड-डेचे वरिष्ठ पत्रकार जे डे यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या पथकात देखील भारती यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. २६/११ च्या दहशतवादी अजमल कसाबला फाशीची शिक्षा देण्यासाठी येरवडा तुरुंगात नेण्याची जबाबदारी ज्या विश्वासू अधिकाऱ्यावर सोपविण्यात आली होती त्यापैकी देवेन भारती एक होते. राज्यातील इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा कणा मोडण्यासाठीही भारती यांना ओळखले जातात.