मुंबईला विशेष पोलीस आयुक्तांची गरज का वाटते ?

159
मुंबई शहराला विशेष पोलीस आयुक्त हे पद निर्माण करण्यात येणार असल्याची चर्चा मागील महिन्याभरापासून पोलीस दलात सुरू आहे. मुंबईला विशेष पोलीस आयुक्त हे पद निर्माण करण्यासाठी सरकारला का गरज वाटत असावी, मुंबई पोलीस आयुक्त असताना या नवीन पदाची निर्मिती करून मुंबई पोलीस आयुक्तांचा भार कमी करण्यासाठी हे पद निर्माण केले तर जात नाही ना? अशी चर्चा मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यात सुरू आहे.
मुंबईला विशेष पोलीस आयुक्त हे पद नव्याने निर्माण करण्यासाठी मागील दोन महिन्यांपासून सरकारमध्ये हालचाली सुरू आहेत. या पदावर अधिका-यांची नेमणूक करण्यासाठी अनेक ज्येष्ठ आयपीएस अधिकारी यांचे नाव चर्चेत आले आहे. या ज्येष्ठ अधिकाऱ्यांपैकी देवेन भारती यांच्या नावाची जोरदार चर्चा मुंबई पोलीस दलात सुरू आहे. शासनाकडून लवकरच विशेष पोलीस आयुक्तपदाचे आदेश काढण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते. परंतु मुंबई पोलीस दलात या नव्या पदाची काय आवश्यकता भासली असावी, हे पद निर्माण करण्यामागे सरकारची काय योजना असावी याबाबत काही अधिका-यांशी जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
मुंबई पोलीस आयुक्त हे पद आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये मानाचे पद मानले जाते. मुंबईचे पोलीस आयुक्त बनावं असं प्रत्येक आयपीएस अधिकाऱ्याना वाटतं. मुंबई पोलीस आयुक्त या पदाला पोलीस महासंचालक पदाचा दर्जा देण्यात आलेला आहे.
वर्षानुवर्षापासून मुंबई पोलीस दलात पोलीस आयुक्त या पदाव्यतिरिक्त मुंबईत ५ सहपोलीस आयुक्त आहेत. प्रशासन, गुन्हे, कायदा व सुव्यवस्था, आर्थिक गुन्हे शाखा आणि वाहतूक विभाग या पाच जागांवर सहपोलिस आयुक्त दर्जाचे अधिकारी असून त्यांच्यावर पोलीस आयुक्त हे पद आहेत.
मुंबईतील वाढती लोकसंख्या त्याचसोबत वाढणारी गुन्हेगारी, वाढत्या राजकीय घडामोडी, मोर्चे, आंदोलने, मेळावे, व्हीआयपी मूव्हमेंट, महिलांची सुरक्षा, इन्फ्रास्ट्रक्चर सोबत मुंबईत वाढणाऱ्या वाहनांची गर्दी हे सर्व पाहता मागील काही वर्षात मुंबईवर मोठा भार वाढला आहे. मुंबई पोलीस दलाचे विभाजन करून उपनगरासाठी वेगळे पोलीस आयुक्तालय निर्माण करण्यासाठी अनेक वर्षांपूर्वी प्रयत्नदेखील करण्यात आला आहे. त्यासाठी पोलीस आयुक्तालय (उपनगरे )यासाठी कलिना येथे जागादेखील निश्चित करण्यात आली होती. परंतु मुंबई पोलीस दलाचे विभाजन अजूनही बारगळे आहे, आज ही कलिना येथे पोलीस आयुक्तालय (उपनगरे) इमारत अर्धवट बांधलेल्या अवस्थेत उभी आहे.
मुंबई पोलीस आयुक्तांचा ताण कमी करण्यासाठी मुंबईला विशेष पोलीस आयुक्तची नेमणूक करण्यात येणार असल्याचे एकीकडे बोलले जात आहे तर दुसरीकडे महानगर पालिकेच्या निवडणुका, राजकीय घडामोडी बघता हे पद निर्माण करण्यात येत असल्याची चर्चा आहे. या पदासाठी १९९४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी देवेन भारती यांच्या नावाला पसंती सरकारकडून देण्यात येत आहे. भारती हे सध्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे अतिरिक्त महासंचालक म्हणून नियुक्त आहेत. महाविकास आघाडीच्या काळात देवेन भारती यांना राज्यात कुठलीही महत्वाची जवाबदारी देण्यात आलेली नव्हती, या सरकारच्या काळात मात्र त्यांना मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त पदाची जवाबदारी देण्याच्या हालचाली सुरू आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.