दहिसर येथील बँक दरोडा ८ तासांतच पोलिसांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी दोन चुलत भावांना पोलिसांनी अटक केली असून एक पिस्तुल आणि सव्वा दोन लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. आरोपींना अटक करण्यासाठी श्वान पथकाने महत्वाची भूमिका पार पाडली आहे. दरोडा टाकून पळून जात असताना एकाची चप्पल बँकेत राहिल्यामुळे या चप्पलेच्या वासावरून पोलिसांच्या श्वान पथकातील ‘जेसी’ या श्वानाने दरोडेखोर लपून बसलेल्या ठिकाणी आणून पोहोचवले.
वडिलांचे कर्ज फेडण्यासाठी दरोडा…
विकास यादव आणि धर्मेंद्र यादव असे अटक करण्यात आलेल्या दोन्ही दरोडेखोरांची नावे आहेत. ते दोघे सख्खे चुलत भाऊ आहेत, धर्मेंद्र हा लहानाचा मोठा दहिसर पूर्वेतील रावळपाडा येथे झाला असून विकास हा काही महिन्यांपूर्वीच उत्तर प्रदेशातून मुंबईत आला होता. दोघांच्या घरची परिस्थिती हालाखीची त्यात विकास च्या वडिलांवर ४ ते ५ लाखांचे कर्ज झाले होते. वडिलांचे कर्ज फेडण्यासाठी विकास चुलत भाऊ धर्मेंद्रकडे आला होता. दोघे कॅटरिंग सर्व्हिसमध्ये काम करीत होते. मात्र पैशांची जुळवाजुळव होत नसल्यामुळे कर्ज कसे फेडायचे याची चिंता विकासाला लागली होती, धर्मेंद्र याला देखील पैशांची गरज होती. दोघांनी झटपट पैसे कसे मिळतील हा विचार करीत होते.
बँक लुटण्याची योजना आखली…
विकास आणि धर्मेंद्र या दोघांनी बँक लुटण्याची योजना आखली, बँकेत भरपूर पैसे असतात, बँक लुटून गावी पळून जाण्याचा बेत सहा महिन्यांपूर्वी दोघांनी आखला होता. यासाठी त्यांनी मोबाईलवर बँक रॉबरीचे व्हिडिओ बघण्यास सुरुवात केली, सुमारे दीडशे-दोनशे बँक रॉबरीचे व्हिडिओ बघितल्यानंतर बँक कशी लुटायची, हे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर दोघे तयारीला लागले. कॅटरिंगचे काम करून जमवलेल्या पैशातून दोघांनी उत्तर प्रदेश येथून ४० हजार रुपयांची पिस्तुल आणि काडतुसे खरेदी केली. गावी त्यांनी मोकळ्या जागेत पिस्तुल चालवण्याचा आणि बँक कशी लुटायची याचा सराव केला.
(हेही वाचा ‘#कैलेंडर _बदलें_संस्कृति_नही’ का होतंय ट्विटरवर ट्रेंड?)
लुटण्यासाठी दहिसर परिसरात बँकेचा शोध…
मुंबईत आल्यानंतर या दोघांनी दहिसर, बोरिवली परिसरात असलेल्या बँकांची रेकी सुरू केली होती. जी बँक रेल्वे स्थानकापासून जवळ असेल, ज्या बँकेत सुरक्षा रक्षक नसतील आणि बँक लुटीनंतर पळून जाण्यासाठी सोपा मार्ग असेल अशी बँक शोधाशोध केल्यानंतर त्यांना दहिसर पश्चिमेतील रेल्वे स्थानकजवळ असणाऱ्या गुरुकुल इमारतीच्या तळमजल्यावर असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया ही निवडली. एक महिना या बँकेची रेकी केल्यानंतर बँकेत कमी गर्दी केव्हा असते बँकेत किती कर्मचारी आहे याची माहिती या दोघांनी काढली होती.
दिवस ठरला…
दरोडा टाकण्याची तयारी पूर्ण झाल्यानंतर या दोघांनी बुधवारी दुपारी बँक लुटायची आणि पळ काढायचा असे ठरवले. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास या दोघांनी तोंडाला मास्क लावून बँकेत प्रवेश करताच प्रवेशद्वार जवळच त्यांनी गोळीबार केला, त्यातील एक गोळी बँकेतील कंत्राटी कर्मचारी गोमाणे याला लागली आणि तो जखमी होऊन खाली कोसळतात या दोघांपैकी एकाने बँक कर्मचारी यांच्यावर पिस्तुल रोखून ठेवले व दुसऱ्याने कॅशियरच्या काउंटरच्या आत जाऊन ड्रॉवर मधील पावणे तीन लाखांची रक्कम काढून पोबारा केला होता. या बँक दरोड्यात बँकेच्या कंत्राटी कर्मचारी गोमाणे याचा मृत्यु झाला.
श्वान पथकाने काढला माग…
बँकेत दिवसा ढवळ्या पडलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यामुळे पूर्ण मुंबई हादरली होती. एमएचबी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर उत्तर प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त प्रवीण पडवळ, पो.उपायुक्त विशाल ठाकूर यांनी आरोपीच्या शोधासाठी आठ पथके तयार केली होती. तसेच गुन्हा अन्वेषण शाखेचे विविध पथके आणि श्वान पथक बोलावण्यात आले होते. तपास पथकाने दरोडेखोर पळून गेलेल्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले, तर बँकच्या आतमध्ये आरोपीचे काही पुरावे मिळतात का हे शोधत असताना पोलिसांना चप्पलीचा एकच पाय बँकेच्या बाहेर मिळाला. ही चप्पल दरोडेखोरापैकी एकाची असेल ही खात्री करण्यात आले. घटनास्थळी दाखल झालेले श्वान पथकातील ‘जेसी’ या श्वानाला चप्पलीचा वास देण्यात आल्यानंतर ‘जेसी वासाच्या दिशेने पोलिसांना घेऊन निघाली, पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणार पूल ओलांडल्यावर जेसी रावळपाडा येथील एका घराजवळ घुटमळू लागली. दरोडेखोर आसपास असल्याची चाहूल लागताच तपास पथकाने आतून बंद असलेल्या खोल्या तपासल्या असता एका खोलीत धर्मेंद्र यादव हा आरोपी मिळाला, तर दुसऱ्या चाळीतील एका खोलीतून विकास यादव याला ताब्यात घेण्यात आले.
Join Our WhatsApp Community