दिव्यांगांनी उंचावली भारतीयांची मान… ‘हे’ शिखर केले सर

बर्फाच्छादित पर्वतरांगा, हिमनद्या यांच्याशी झुंज देत भारतीय दिव्यांगांच्या टीमने १५ हजार ६३२ फूट उंचीवर पोहचून जागतिक विक्रम रचला.

सियाचीन… जगातील सर्वात उंचावर असणारी युध्दभूमी अशी या जागेची ओळख आहे. काही दिवसांपूर्वीच भारतीय दिव्यांग खेळाडूंनी टोकियो पॅराम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत १९ पदकं जिंकून इतिहास रचला. त्यानंतर आता दिव्यांगांच्या टीमने पुन्हा एकदा देशवासीयांची मान उंचावेल अशी अभिमानस्पद कामगिरी केली आहे. देशातील आठ दिव्यांगांनी सियाचीन ग्लेशियरच्या १५ हजार ६३२ फूट उंचीवर असलेले कुमार पोस्ट सर करुन पोहचून जागतिक विक्रम नोंदवला आहे.

रचला जागतिक विक्रम

ऑपरेशन ब्लू फ्रीडम मोहिमेअंतर्गत काही दिव्यांगांनी सियाचीन शिखर सर करण्याचे ठरवले. त्यांच्या टीमचे नेतृत्व करण्याची जबाबदारी ‘काँकर लँड एअर वॉटर’ म्हणजेच सीएलएडब्ल्यूवर होती. सियाचीन ही जगातील सर्वात उंचावर असलेली युद्धभूमी आहे. तिथे तापमान हे शून्य ते उणे ५० डिग्री सेल्सियस इतके कमी असते. वेगाने वाहणारे वारे, शरीर गोठवणारी थंडी, दूरदूरपर्यंत दिसणाऱ्या बर्फाच्छादित पर्वतरांगा, हिमनद्या यांच्याशी झुंज देत भारतीय दिव्यांगांच्या टीमने १५ हजार ६३२ फूट उंचीवर पोहचून जागतिक विक्रम रचला.

अशी केली तयारी

दिव्यांगांच्या टीमने १ सप्टेंबरला सियाचीनच्या बेस कॅम्पवरुन मोहिमेला सुरुवात केली होती. मोहिमेपूर्वी या संपूर्ण टीमला प्रशिक्षण देण्याचे काम सशस्त्र दलाच्या दिग्गजांच्या चमूने म्हणजेच सीएलएडब्ल्यूने केले होते. प्रशिक्षणादरम्यान टीमला स्काय डाईविंग, स्कुबा डायविंग आणि गिर्यारोहणाचे प्रशिक्षण देण्यात आले. सुरुवातीला सियाचीन ग्लेशियर चढाई मोहिमेसाठी २० जणांची निवड करण्यात आली होती. मात्र, नंतर अंतिम टीममध्ये आठ जणांची निवड करण्यात आली.

अजून विक्रम करणार

सियाचीन मोहिमेत जागतिक विक्रम केल्यावर ही टीम आता मालदीवच्या समुद्रात स्कुबा डायविंग आणि दुबईमध्ये पॅराजंपिंग करुन आणखी दोन विश्वविक्रम नावावर करण्याच्या तयारीत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here