कोरोना रुग्णांचा राज्यात नवा रेकॉर्ड…सरकारी आणि खासगी डॉक्टरांनाही कोरोनाची लागण

101

गुरुवारी राज्यातील विविध भागांत तब्बल ३६ हजार २६५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. मोठ्या संख्येने दिवसभरातील नोंदीने राज्यातील विविध भागांतील सक्रीय रुग्णांची संख्या एक लाखाहून पुढे सरकली असल्याने सरकारचे धाबे दणाणले आहे. राज्यात आता १ लाख १४ हजार ८४७ सक्रीय रुग्ण आहे.

वाढत्या रुग्ण संख्येसह राज्यातील सरकारी रुग्णालये तसेच खासगी रुग्णालयांतील आरोग्य सेवेलाही आव्हान उभे राहिले आहे. रुग्णांवर उपचार करणा-या डॉक्टरांनाही कोविडने ग्रासले आहे. सततच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९६.१७ टक्क्यांवर घसरले आहे.

डॉक्टरांना कोरोनाची लागण

मुंबईतील नामांकित खासगी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर्स, तसेच विभागप्रमुख कोरोनामुळे घरातच विलगीकरणात आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेतील मनुष्यबळावर काही दिवसांतच परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. आरोग्य सेवेतील कर्मचा-यांमध्ये ओमायक्रॉनचा विषाणू आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली. काही डॉक्टरांनी लक्षणे आढळून येताच अगोदरच स्वतःला घरी विलगीकरणात ठेवले आहे. मुंबईतील वर्सोवा येथील धीरुबाई अंबानी रुग्णालय तसेच कुर्ला येथील कोहिनूर क्रिटिकेअर रुग्णालयांतील डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाली आहे. मात्र ओमायक्रॉनबाबत कोणतीच स्पष्टता दिली गेलेली नाही. या रुग्णालयांतील विभागप्रमुख सध्या सुट्टीवर गेले असल्याचे सांगण्यात आले. तर विभागातील इतर डॉक्टर्स सध्या रुग्णसेवेकडे लक्ष केंद्रीत करत आहेत. खासगी रुग्णालयातही डॉक्टरांना आता कोरोनाची लागण होत असल्याबाबत भारतीय वैद्यकीय संघटनेनेही पुष्टी दिली असून, देशभरातील कोरोनाबाधित डॉक्टरांची संख्या येत्या आठवड्याच्या शेवटी जाहीर केली जाईल, असे सांगितले.

( हेही वाचा : वाढत्या कोरोना रुग्ण संख्येबाबत डॉक्टरांचे काय आहे म्हणणे…प्रशासनाची काय आहे हतबलता )

गुरुवारी ८ हजार रुग्णांवर कोरोनावरील यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आले. मात्र तिप्पट्टीने एका दिवसांतील रुग्णसंख्या आढळून आली. आज १३ रुग्णांनी आपला जीव गमावला. राज्यातील मृत्यूदर २.०८ टक्के एवढा नोंदवला गेला.

राज्यात ७८६ ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद

आज राज्यात ७९ ओमायक्रॉनबाधित रुग्ण आढळले. मुंबईत ५७, ठाण्यात ७, नागपूरात ६, पुण्यात ८, पिंपरी चिंचवडमध्ये १ रुग्णांची नोंद झाली. आजपर्यंत राज्यात ७८६ ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी ३८१ रुग्णांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आले.

राज्यातील प्रमुख दोन शहरांमधील बहुतांश रुग्णसंख्या लक्षणविरहीत आहेत. मुंबई आणि पुण्यात अर्ध्याहून अधिक रुग्णांमध्ये लक्षणे दिसून आलेली नाही. आरोग्याची काळजी घ्या परंतु योग्य खबरदारी घेतल्यास काळजीचे कारण नाही. असे आरोग्य विभाग सर्व्हेक्षण अधिकारी (संसर्गजन्य आजार) डॉ. प्रदीप आवटे यांनी स्पष्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.