प्रवाशांचे सामान सोडून स्पाईस जेट दिल्लीत; विमानतळावर प्रवासी संतापले

128

नाशिककरांना स्पाईस जेटने मोठा धक्का दिला. मंगळवारी दुपारी पावणे एक वाजताचा वेळ असणारे विमान तब्बल दीड-दोन तास विलंबाने झेपावले. दिल्लीत गेल्यानंतर विमानातून प्रवाशांचे सामान न आणता त्यांना बेल्टवर पाठवण्यात आले. नंतर सामान आलेच नसून ते स्वतंत्र विमानाने पाठवण्यात येणार असल्याचे आणि बुधवारी मध्यरात्री सामान देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आल्याने आणखीनच गोंधळ उडाला. पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्यानंतर गोंधळ निस्तरण्याचे प्रयत्न झाले. तर दुसरीकडे कंपनीने प्रवाशांना दीड हजार रुपयांची नाममात्र मदत राहण्या- खाण्यासाठी दिली.

ओझर विमानतळावरुन दुपारी 12.45 वाजता स्पाइस जेटचे विमान झेपावणार होते. मात्र, दुपारी सव्वा दोन वाजता ते झेपावले. या विमानात 166 प्रवासी होते. त्यातच विमान स्पाइस जेटचे नव्हते तर कोरंडेन एअरलाईन्सचे हायर केलेले विमान होते. दिल्लीत साडेतीन वाजता पोहोचल्यानंतर लगेजसाठी आठ क्रमांकाच्या बेल्टवर जाण्याची सूचना करण्यात आली. त्यानुसार प्रवासी तेथे गेले, लगेज येत नव्हते. चौकशीअंती प्रवाशांचे लगेज आलेच नसल्याने त्यांचा संताप वाढला. कंपनीकडून लगेच रात्री तीन वाजता येईल, असे सांगण्यात येत असले तरी ते नाशिक- दिल्ली फ्लाइटबरोबर का आणले नाही, हे कंपनीकडून सांगितले जात नव्हते. प्रवाशांनी एअरपोर्ट पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी चौकशी केली. त्यानंतर मध्यरात्री हे सामान पोहोचले तोपर्यंत प्रवासी जेथे असतील तेथे त्यांना सामान पोहोचवण्यात येईल, असे सांगण्यात आले.

( हेही वाचा: गिरगावमधील पुंगालिया हाऊस कंपाऊंडमध्ये भीषण आग; लाखोंच्या गाड्या जळून खाक )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.