मसाल्यांची निर्यात दुप्पट करण्याचा भारताचा प्रयत्न!

111

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी येत्या पाच वर्षात या मसाल्यांची निर्यात दुप्पट करून 10 अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे आवाहन मसाले उद्योग क्षेत्राला केले. मसाले मंडळाच्या 35 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ”आपण आता मसाल्यांच्या 10 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीचे महत्वाकांक्षी उद्दिष्ट 2030 पर्यंत पूर्ण करण्याची आकांक्षा बाळगली आहे, मात्र कदाचित त्याहूनही जलद, हे उद्दिष्ट येत्या पाच वर्षांत आपण गाठू शकतो का? आगामी पाच वर्षांत 2027 पर्यंत आपण आपली निर्यात दुप्पट करून 10 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचवण्याची आणि त्यानंतर पुढील पाच वर्षांत आपली निर्यात 10 अब्ज डॉलर्सच्या दुप्पट करण्याची आकांक्षा बाळगूया” ,असे गोयल यांनी सांगितले.

मसाले निर्यातीत वाढ

2014-21 मध्ये मसाल्यांच्या निर्यातीत 115% आणि मूल्यात (अमेरिकी डॉलर्स) 84% वाढ झाली असून, 2020-21 मध्ये ही निर्यात 4.2 अब्ज डॉलर्स इतक्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचल्याबद्दल गोयल यांनी समाधान व्यक्त केले. “आता, भारतीय मसाले आणि मसाले उत्पादने जगभरातील 180 हून अधिक ठिकाणी पोहोचत आहेत,” असे ते म्हणाले.
”कोविडच्या काळात भारताची औषधे आणि लसींसोबतच जगाने आपल्या मसाले आणि काढ्याचे महत्त्व अनुभवले.” असे गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करून सांगितले. हळदी दूध/हळद लट्टे हे आपल्या आजीचे घरगुती उपाय आणि दालचिनी, तुळस (तुळशीची पाने) इ. मसाले हे आता जगातील मुख्य घरगुती पदार्थ बनले आहेत. किंबहुना, भारताने गेल्या वर्षी हळदीच्या निर्यातीत 42% वाढ नोंदवली,” असे गोयल यांनी सांगितले.

स्पर्धात्मकता टिकवण्याचे उद्धिष्ट

जागतिक मसाले क्षेत्रात भारत आघाडीवर असला, तरी या क्षेत्रालाही आव्हानांचा सामना करावा लागत आहे, असे गोयल म्हणाले. ”अन्न सुरक्षा, गुणवत्ता आणि शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध असताना, जगभरातील विविध ग्राहकांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने उच्च श्रेणी मूल्यवर्धन आणि नवीन उत्पादनाच्या विकासावर भर देऊन भारतीय मसाले उद्योगाची स्पर्धात्मकता टिकवून ठेवण्याचे उद्दिष्ट आहे”, असे त्यांनी सांगितले. सरकार लवचिक आणि कार्यक्षम कार्यक्रम आणि उपक्रमांद्वारे देशातून मसाल्यांची निर्यात वाढवण्यासाठी उत्सुक आहे, असे गोयल म्हणाले.

निर्यात वाढवण्याचा मार्ग मोकळा

या कार्यक्रमादरम्यान गोयल यांनी वेलची उत्पादक शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी, मसाले मंडळ आणि भारतीय कृषी विमा कंपनीचा संयुक्त उपक्रम असलेल्या, हवामानावर आधारित नाविन्यपूर्ण पीक विमा योजनेचा प्रारंभ केला. मसाले मंडळाच्या 35 व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी टपाल तिकिटाचे प्रकाशनही केले. सरकारने मसाल्यांच्या क्षेत्रातील जागतिक नेतृत्व म्हणून भारताची निर्यात वाढवण्याचा आणि विस्तारण्याचा मार्ग मोकळा केला आहे, असे गोयल यांनी सांगितले.

भारतातील मसाले जगप्रसिद्ध

सेवेची गुणवत्ता आणि कार्यक्षमतेसाठी नाव कमावण्याच्या अनुषंगाने , भारतातील सर्व प्रदेशांमध्ये गुणवत्ता चाचणी प्रयोगशाळांचे जाळे विस्तारण्याचे आणि सर्वोच्च मानकांचे पालन करण्याचे आवाहन गोयल यांनी मसाले मंडळाला केले. मसाले हे भारतीय खाद्यपदार्थ आणि जीवनशैलीचा एक भाग आहेत, असे ते म्हणाले. वर्षानुवर्षे , भारत हा जगातील मसाल्यांचे आगर आहे. जगातील सर्वात मोठा मसाल्यांचा उत्पादक आणि ग्राहकही आहे. केरळमधील काळी मिरी, गुजरातचे आले आणि ईशान्येकडील नागा मिरची यांसह काश्मीरमधील केशर जगप्रसिद्ध आहे, असे गोयल यांनी सांगितले.

( हेही वाचा: ‘मनसे विद्यार्थी सेने’ला मिळाले नवे ‘गुरुजी’! मराठी भाषा गौरव दिनी पक्षाचा मोठा निर्णय )

गोयल यांचे आवाहन

मसाल्याच्या विविध उत्पादनांसाठी भौगोलिक निर्देशांक टॅग मिळवण्याचे आवाहन गोयल यांनी मसाले उद्योग क्षेत्राला केले. मसाले आणि मसाल्यांच्या उत्पादनांचे आघाडीचे उत्पादक, ग्राहक आणि निर्यातदार म्हणून तसेच मसाल्यांची प्रक्रिया आणि मूल्यवर्धनात जागतिक केंद्र म्हणून.गेल्या काही वर्षात भारताने जागतिक मसाले क्षेत्रात सर्वोच्च स्थान कायम ठेवले आहे, असे गोयल यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.