आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेत आता हिंसाचाराचे सावट पाहायला मिळत आहे. सोमवारी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा दिल्यानंतरही जमावाचा संताप कमी होताना दिसत नाही. हिंसक जमावाने महिंदा राजपक्षे यांच्या वडिलोपार्जित घराला आग लावली. आंदोलकांनी हंबनटोटा येथील राजपक्षे कुटुंबाचे वडिलोपार्जित घर ‘मेदमुलाना वालवा’ जाळले. आगीत हे घर पूर्णपणे जळून खाक झाले. या घटनेचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. घरात आग लागल्याचे दिसून येत आहे.
(हेही वाचा – नागपुरात खळबळ, रेल्वे स्थानकाजवळ बॉम्ब सदृश आढळल्या वस्तू )
समर्थकांनी आंदोलकांवर हल्ला केल्यानंतर हिंसाचार
या घटनेनंतर श्रीलंकेतील परिस्थिती सतत बिघडत चालल्याचे दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 200 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सत्ताधारी पक्षाच्या खासदाराचाही समावेश आहे. श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी सोमवारी राजीनामा दिल्यानंतर देशातील परिस्थिती अधिकच बिघडली. हजारो सरकार समर्थकांनी आंदोलकांवर हल्ला केल्यानंतर हिंसाचार सुरू झाला.
राजपक्षेंकडून पंतप्रधानांना राजीनामा देण्याचे आदेश
मिळालेल्या माहितीनुसार, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आर्थिक आणीबाणीच्या संकटात सापडलेल्या श्रीलंकेत गेल्या दोन महिन्यांपासून अस्वस्थता आहे. राष्ट्पती गोटाबाया राजपक्षे यांनी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महिंदा यांनी सोमवारी राजीनामा दिला. ट्विटरवर त्यांनी ही माहिती जनतेला दिली. त्यानंतर राजपक्षे समर्थकांनी विरोधकांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. तर राजधानी कोलंबोत अनेक ठिकाणी जाळपोळ कऱण्यात आली. या सर्व गदारोळात शेकडो लोक जखमी झाले.