श्रीलंकेतील आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. संतप्त लोक आता श्रीलंकेच्या राष्ट्रपतींचे घर जाळण्यासही मागेपुढे पाहत नसून नागरिकांनी केलेल्या या हिंसक निदर्शनांनंतर राष्ट्रपती गोटाबाया राजपाक्षे यांनी देशात आणीबाणी जाहीर केली आहे. देशाची सुरक्षा आणि आवश्यक सेवांच्या पुरवठ्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.
( हेही वाचा : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात गौप्यस्फोट करणाऱ्या मुख्य पंचाचा मृत्यू! )
आर्थिक संकट
श्रीलंका सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. इंधनासोबतच अनेक जीवनावश्यक वस्तूंचाही देशात मोठा तुटवडा आहे. श्रीलंकेत अनेक तास वीजपुरवठा सुद्धा खंडित करण्यात आला आहे. देशातील परिस्थिती अशी आहे की पेपरच्या तुटवड्यामुळे सर्व परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलाव्या लागल्या आहेत. श्रीलंका सरकारने या हिंसक निदर्शनाला ‘दहशतवादी कृत्य’ म्हटले आहे.
राष्ट्रपतींच्या निवासस्थानाबाहेर हिंसाचार
गुरुवारी शेकडो आंदोलक राष्ट्रपतींच्या निवासस्थानाबाहेर जमले आणि त्यांनी हिंसक निदर्शने केली. राष्ट्रपतींच्या अपयशामुळेच आर्थिक संकट आले आहे, असे या आंदोलकांनी म्हटले आहे. त्यामुळे राष्ट्रपतींनी राजीनामा द्यावा या मागणीवरून आंदोलनाला हिंसक वळण लागले. हिंसक आंदोलकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाजवळ अनेक वाहने जाळली. राष्ट्रपतींच्या निवासस्थानाजवळील स्टील बॅरिकेड पाडल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या आणि पाण्याच्या तोफांचा मारा केला तसेच अनेकांना अटकही झाली आहे. कोलंबो शहरातील बहुतांश भागात काही काळासाठी कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. जीवनावश्यक सर्वच वस्तू महाग झाल्यामुळे कुटुंबाला खायला काय देणार याची भिती सामान्य लोकांच्या मनात निर्माण झाली आहे.
श्रीलंकेतील आर्थिक परिस्थिती
- ब्रेड पॅकेट – १५० रुपये
- एक किलो दूध पावडर – १ हजार ९७५ रुपये
- एलपीडी सिलिंडर – ४ हजार ११९ रुपये
- पेट्रोल – २५४ रुपये प्रति लीटर
- डिझेल – १७६ रुपये प्रति लीटर