दसरा मेळाव्याला ‘एसटी’ खेचणार सर्वाधिक गर्दी

83
दसरा मेळाव्याला ऐतिहासिक गर्दी जमवत शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाकडून सुरू आहे. त्यासाठी खासगी वाहनांसह रेल्वे बुकिंग करण्यात आल्या आहेत. शिवाय एसटी महामंडळाकडे प्रासंगिक करार म्हणून बस उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. शिंदे गटाकडून ४ हजार १००, तर ठाकरे गटाकडून ४५० गाड्यांची मागणी आल्याचे एसटी महामंडळातील सूत्रांनी सांगितले.
संभाजीनगर, नाशिक, पुणे, नागपूर आणि अमरावती या पाच विभागांतून प्रत्येकी पाचशे गाड्या रवाना करण्याचे शिंदे गटाचे नियोजन आहे. त्यासह एसटी महामंडळाकडे सर्व जिल्ह्यांतून ४ हजार १०० एसटी गाड्या देण्यासंदर्भात विचारणा करण्यात आली आहे.
सध्या एसटीकडे १५ हजार ५०० गाड्या आहेत. त्यातील चार हजार गाड्या शिंदे गटाला दिल्यास ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था कोलमडू शकते. त्याशिवाय मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाचा तुटवडा आणि प्रासंगिक करार करण्यासाठी सुस्थितीत असलेल्या पुरेशा गाड्या उपलब्ध नसणे हीदेखील समस्या आहे. त्यामुळे मेळाव्यासाठी मागणीनुसार गाड्या कशा उपलब्ध करून द्यायच्या, असाही प्रश्न एसटी महामंडळासमोर उभा आहे.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी संभाजीनगरमधील सिल्लोड आगारप्रमुखांकडे ३०० एसटी गाड्या आरक्षित करण्यासाठी अर्ज केला आहे. ठाण्याबरोबरच पालघर, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, जळगाव यासह अन्य भागांतून किती एसटी लागतील, याची माहितीही संबंधित आगारप्रमुखांना देण्यात आली आहे. एसटी महामंडळाच्या मुंबईतील मुख्यालयात येऊन मोठ्या प्रमाणात एसटी आरक्षित करण्याबाबत विचारणा केली जात असल्याचे एसटी महामंडळातील सूत्रांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.