प्रतीक्षा नगरमधील तुंबणाऱ्या पाण्याची समस्या कायमच: नाला रुंदीकरणाचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला!

खुद्द शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक या भागातील असताना हा प्रस्ताव शिवसेनेने प्रस्ताव फेटाळल्याने याचा जबाब आता स्थानिक नगरसेवकालाच द्यावा लागणार आहे.

92

मुंबईतील शहर व उपनगरांमधील विविध ३०८ ठिकाणांवरील सखल भागातील पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी अनेक नाल्यांच्या रुंदीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पाठपुराव्यानुसार, या नाल्यांच्या कामांचे प्रस्ताव स्थायी समितीत तातडीने मंजूर करण्यात आले आहेत. पण तरी अशाच प्रकारच्या प्रतीक्षा नगर येथील नाल्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव सत्ताधारी शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांनी फेटाळून लावला. सखल भागात तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा करण्याच्या दृष्टीकोनात हाती घेण्यात आलेल्या नाल्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव स्थायी समितीने फेरविचारासाठी पाठवून दिला आहे. विशेष म्हणजे प्रतीक्षा नगरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुंबत असताना स्थायी समितीने फेटाळलेला प्रस्ताव चर्चेचा विषय ठरलेला आहे.

प्रस्ताव फेरविचारासाठी

मुंबई महापालिकेचा सन २०२१-२२चा अर्थसंकल्प मांडताना आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मुंबईतील ३०८ सखल भागातील पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी नाल्यांच्या रुंदीकरणाची तसेच नवीन पर्जन्य जलवाहिनी टाकण्याची घोषणा केली. त्यानंतर पुढील आठवड्यात पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नाल्यांचे रुंदीकरण तसेच पर्जन्य वाहिनी टाकण्याचा ५८ कामांचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीला आला होता. या सर्व प्रस्तावांना स्थायी समितीत कोणत्याही चर्चेविना मंजुरी देण्यात अली आहे. पण यापैकी केवळ एफ उत्तर विभागातील प्रतीक्षा नगर येथील परिघीय नाल्याचे रुंदीकरण व खोलीकरण करुन प्रवाह सुरळीत करण्यासाठी आर.सी.सी. भिंतीचे बांधकाम करण्याचा प्रस्ताव राखून ठेवला होता. पण मागील बुधवारी झालेल्या या बैठकीत हा एकमेव नाले रुंदीकरणाचा प्रस्ताव प्रशासनाकडे फेरविचारासाठी पाठवण्यात आला आहे.

(हेही वाचाः मुंबईत खाऊगल्यांसह चौपाट्यांवरही अँटीजेन चाचणी!)

भाजप नेत्यांचा पाठिंबा

प्रतीक्षा नगर भागात पाणी तुंबत असल्याने या नाल्याचे रुंदीकरण करण्याचा निर्णय पर्जन्य जलवाहिनी विभागाने घेतला होता. पण हा प्रस्ताव फेरविचारासाठी परत पाठवण्याची उपसूचना सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी केली. हा प्रस्ताव फेरविचारासाठी पाठवण्याची सूचना करताना त्यांनी सल्लागार म्हणून नेमण्यात आलेल्या नयन ढोलकीया यांची निवड कधी झाली होती आणि त्याचा ठराव कधी मंजूर केला होता, अशी विचारणा केली. तसेच त्यांना किती सेवा शुल्क दिले याची विचारणा करत त्यांनी हा प्रस्ताव फेरविचारासाठी परत पाठवण्याची मागणी केली. तर भाजपचे प्रभाकर शिंदे यांनी या नाल्याचे किती कि.मी लांबीचे रुंदीकरण व खोलीकरण करण्यात येणार आहे, त्यांची भिंत किती लांबीची बांधली जाणार आहे याची माहिती दिली नसल्याचे सांगत, या फेरविचाराच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. भाजपचे भालचंद्र शिरसाट यांनी हा अपूर्ण प्रस्ताव असल्याने परत पाठवण्याची सूचना केली.

स्थानिक त्रस्त

प्रतीक्षा नगर येथील परिघीय नाला हा शंभर टक्के अतिक्रमित असून यापूर्वीही अशाप्रकारचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. तसेच यापूर्वी मंजूर केलेल्या प्रस्तावांमध्ये किती मीटर लांबीचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात येत आहे तसेच किती कि.मी लांबीची भिंत बांधली जात आहे, याची माहिती दिलेली नसतानाही मंजूर करण्यात आले. त्यामुळे सर्व प्रस्तावांमध्ये हा एकच प्रस्ताव का फेटाळून लावला गेला, असा प्रश्न प्रतीक्षानगर वासियांना पडला आहे. प्रतीक्षा नगर भागातील सखल भागात पाणी तुंबत असल्याने पावसाळ्यात मोठ्या समस्येला सामोरे जावे लागते. प्रतीक्षा नगरमधील रहिवाशांची यातून सुटका करण्याच्या दृष्टीकोनात या नाल्याचे रुंदीकरण होणे आवश्यक आहे. खुद्द शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक या भागातील असताना हा प्रस्ताव शिवसेनेने प्रस्ताव फेटाळल्याने याचा जबाब आता स्थानिक नगरसेवकालाच द्यावा लागणार आहे.

(हेही वाचाः बाधित रुग्णांना ८० टक्के कोट्यातून दाखल करा: आयुक्तांचे खाजगी रुग्णांलयांना निर्देश!)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.