धक्कादायक! मुंबईत घातपाताचा कट उधळला

126
राज्य दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) काळा चौकी युनिटने मुंबईत मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी ११ जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी अनेक जणांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत, या टोळीचा मुंबईत मोठा घातपात करण्याचा मनसुबा असल्याची माहिती चौकशीत समोर येत आहे. या अनुषंगाने एटीएसकडून तपास करण्यात येत आहे. अटक करण्यात आलेले कल्याण, डोंबिवली, मुंबई, ठाणे नवी मुंबई परिसरात राहणारे आहेत.

काय आहे प्रकरण

राज्य दहशतवाद विरोधी पथक काळाचौकी युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश साईल आणि त्यांचे पथक मागील काही दिवसांपासून या टोळीवर लक्ष ठेवून होते. दरम्यान या टोळीतील काही सदस्य हत्यारांची देवाण-घेवाण करणार असल्याची माहिती मिळताच एटीएसच्या पथकाने या टोळीतील काही जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या टोळीतील काही सदस्यांकडून अत्याधुनिक पिस्तुल आणि काडतुसे जप्त करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्याची कसून चौकशी केली असता त्यांचे आणखी साथीदार असल्याची माहिती मिळताच एटीएसने त्यांचे इतर साथीदार असे एकूण ११ जणांच्या टोळीला अटक करून त्यांच्याकडून १३ अत्याधुनिक पिस्तुल, ३६ काडतुसे एवढा शस्त्रसाठा एटीएसने जप्त केला आहे.

एटीएसकडून तपास सुरू

अटक करण्यात आलेल्या ११ जणांमध्ये काही जणांविरुद्ध मुंबई, ठाणे नवी मुंबईत गंभीर गुन्ह्यांची नोंद असून काही जण शस्त्राचा पुरवठा करणारे असल्याची माहिती चौकशीत समोर येत आहे. या टोळीचा मुंबईत मोठा घातपात करण्याचा तर कट नव्हता ना या अनुषंगाने एटीएसकडून तपास सुरू आहे. मुंबईत महानगर पालिकेच्या निवडणुकांचे वातावरण निर्माण झालेले असताना कुठल्याही क्षणी निवडणुका जाहीर करण्यात येणार आहे. तत्पूर्वी एटीएसच्या पथकाने मुंबईत जप्त करण्यात आलेला शस्त्रसाठा आणि त्याच सोबत अटक करण्यात आलेल्या ११ जणांचा टोळीकडून मुंबईत निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर घातपात करण्याची शक्यता तर नव्हती ना असा प्रश्न उपस्थित होत आहे. एटीएसकडून या अनुषंगाने तपास सुरू असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. याबाबत अधिक माहिती विचारण्यात आली असता अजून तपास असल्याचे सांगण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.