बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सिंहाची संख्या वाढवावी म्हणून गुजरातमधून सिंह मिळवण्यासाठी राज्याच्या वनविभागाच्या वरिष्ठ अधिका-यांनी थेट गुजरातचा रस्ता धरला आहे. बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक व वनसंरक्षक जी मल्लिकार्जून तसेच पश्चिम वन्यजीव वनविभागाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. क्लेमेंट बॅन सध्या गुजरात दौ-यावर असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. बुधवारी उद्यानाचे संचालक व वनसंरक्षक गुजरातेत पोहोचले होते. मात्र डॉ बॅन यांच्याबाबतीत खात्रीलायक माहिती मिळाली नाही.
सिंह मिळवण्यासाठीची बोलणी बऱ्याचदा फास्कटली
गेल्या सहा वर्षांपासून उद्यान प्रशासन पार्कातील सिंहाची संख्या वाढवण्यासाठी इतर राज्यांतून सिंह मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी सुरुवातीपासूनच गुजरातमधील सक्करबाग प्राणिसंग्रहालयाशी बोलणे झाले होते. मात्र ही बोलणी बऱ्याचदा फास्कटली. दरम्यानच्या काळात सक्करबाग प्राणिसंग्रहालयातील अधिका-यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालाही भेट दिली होती. सिंहाऐवजी मिळणा-या प्राण्यांबाबतही अंतिम निर्णय होत नसल्याने ही बोलणी यशस्वी नाही झाली. त्यानंतर ओरिसा आणि तेलंगण वनविभागाकडून सिंह मिळवण्याचा प्रयत्न झाला परंतु तिथेही बोलणी अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचली नाही.
(हेही वाचा -२२ एप्रिलपर्यंत कामावर रूजू व्हा, एसटी कामगारांना न्यायालयाचा आदेश)
२०२१ च्या सुरुवातीला उद्यान प्रशासनाने पुन्हा गुजरात वनविभागाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मोबदल्यात एक वाघाची जोडीही दिल्याचे खात्रीलायक पत्रही दिले. एक सिंहाची जोडी तरी द्या, अशी विनवणी अंतिम टप्प्यात पुन्हा बिघडू नये, यासाठी हा प्रश्न आता गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या दरबारी जाणार आहे. कदाचित मोबदल्यात अजून काही प्राण्यांचाही समावेश असेल, असेही सांगितले जात आहे.
कशी असेल डील
एक सिंहाच्या जोडीच्या बदल्यात एक वाघाची जोडी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान देईल हा मूळ प्रस्ताव आहे. त्यात कदाचित अजून एक सिंहाची जोडी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे अधिकारी मागण्याच्या प्रयत्नात आहे. चार बिबटे उद्यान प्रशासन गुजरातला द्यायला तयार आहे. मूळ प्रस्तावात बदल घडल्यास चार सिंहाऐवजी चार वाघ आणि चार बिबटे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून रवाना होतील.
सिंहाचा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या दरबारीच का?
देशभरात सर्वात जास्त सिंहाची संख्या ही गुजरातमध्ये आहे. गुजरातमधील सिंहांची संख्या हे गुजरातचे वैभव म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे सिंहाचा प्रश्न हा मुख्यमंत्री कार्यालयातून हाताळला जातो. गेल्या काही वर्षांपासून गुजरातमधील सिंहांची संख्या आता प्रादेशिक भूभागापेक्षाही जास्त झाल्याचे निदर्शनास येत आहे. सिंह गुजरातच्या नजीकच्या शहरी वस्तीतही जात असल्याचे व्हिडिओ याआधी कित्येकदा समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे सिंह अगोदरच मुबलक संख्येत असल्याने राज्यातील मुंबईतल्या बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सिंहाची संख्या वाढवण्यासाठी एक जोडी तरी निदान मिळाली तर त्यांच्या मिलनातून उद्यानात सिंहांची संख्या वाढेल, असा दृढ आशावाद घेऊन राज्याचे वनाधिकारी गुजरातमध्ये दाखल झाले आहेत.
Join Our WhatsApp Community