भोंग्याचा वाद अधिक चिघळून कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेतील भाषणानंतर राज्यभरातील मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटिसा पाठवून प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. अनेकांना तर पोलिसांनी हद्दपारीची नोटीस पाठवली आहे.
( हेही वाचा : ॲमेझॉनवर गर्भपाताच्या गोळ्या विक्री प्रकरणात कागदपत्रांची चोरी )
प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून हद्दपार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी धार्मिक स्थळावरील बेकायदेशीर भोंग्यविरुद्ध आवाज उठविल्यानंतर महाराष्ट्रात रान पेटले आहे. ठाणे येथील सभेत राज ठाकरे यांनी सरकारला दिलेला ३ मे चा अल्टीमेटम औरंगाबाद येथील सभेत एक दिवसांनी पुढे ढकलण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत केलेल्या भाषणाची दखल गृहविभागाने घेतली असून राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच ४ मे रोजी मनसे कार्यकर्त्यांकडून शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडू शकते याची खबरदारी म्हणून राज्यभरात पोलिसांनी मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठविण्यास सुरुवात केली आहे. तसेच ज्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल आहेत अशा कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून त्यांना हद्दपार करण्यात येत आहे. १५ मे पर्यत हा हद्दीपारीचा कालावधी देण्यात आला आहे.
ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईत ही प्रतिबंधात्मक कारवाई मोठ्या प्रमाणात करण्यात येत असून गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्यांचा गुन्हे शाखेकडून शोध घेतला जात असून त्यांना ताब्यात घेण्यात येत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community