स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा आणि तैलचित्र महाराष्ट्र विधानसभेत लावले जावे, पुष्पेंद्र कुलश्रेष्ठंची मागणी

201

महाराष्ट्रात शिवसेना,भाजप या हिंदुत्ववादी पक्षांची सरकारं आली. हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून दूर जात असल्याचा दावा करत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत फूट पडली. त्यामुळे आता राज्यात हिंदुत्ववादी विचार असलेल्या पक्षांचे सरकार स्थापन झाले आहे.

महाराष्ट्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखं उत्तुंग नेतृत्व दुसरं नाही. त्यामुळे या राज्याचे कायदेमंडळ असलेल्या विधानसभेत क्रांतिकारकांचे मुकूटमणी असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचे भव्य तैलचित्र लावायला हवे आणि विधीमंडळाच्या आवारात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पूर्णाकृती पुतळा विराजित करायला हवा, अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार,सावरकर अभ्यासक आणि राजकीय विश्लेषक पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी केली आहे.

सावरकरांच्या समर्थनार्थ हिंदू पेटून उठले आहेत

कर्नाटकातील शिवमोगा येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा लावण्याला काही समाज कंटकांकडून विरोध करण्यात आला. यावरुन श्रीराम सेनेने आगामी गणेशोत्सवात गणेश मंडळांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा लावण्याचा निर्णय घेतला असून भाजपनेही यासाठी समर्थन दिले आहे. यावर कुलश्रेष्ठ यांनी भाष्य केले आहे. काही वेळा शत्रूंच्या कृतीमुळे हिंदूंच्या मनात देखील चेतना निर्माण होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात कर्नाटकात जे काही झालं त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी गणेशोत्सवात सावरकरांची प्रतिमा लावण्यात येत असेल तरी ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे.

(हेही वाचाः ‘बाळासाहेबांनी मला मिठी मारली आणि…’ राज ठाकरेंनी पहिल्यांदाच सांगितली ‘त्या’ शेवटच्या भेटीची आठवण)

स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आपलं आयुष्य वेचणा-या नायकाची महती आजवर लपवली जात होती. पण आता देशातील बहुसंख्य हिंदूंना सावरकरांचे महत्व पटले आहे. सावरकरांबाबत जो काही अपप्रचार करण्यात येतो तो खोडून काढण्यासाठी आता या देशातील हिंदू युवक स्वतः पेटून उठला आहे याचे समाधान वाटत असल्याचे कुलश्रेष्ठ यांनी म्हटले आहे.

हा सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न

पीएफआय,एसडीपीआय यांसारख्या संघटना या राजकीय मुखवटे घालून इस्लामिक जिहाद आणि गजवा-ए-हिंद ला प्रोत्साहन देत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर या संघटनांकडून होणारी टीका हा सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करुन आपले नाव मोठे करण्याची स्पर्धा सध्या काँग्रेसी आणि इतर पक्षांमध्ये सुरू आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख केल्यामुळे पीएफआय सारख्या संघटनांना भीती वाटत आहे. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अनुयायांना गप्प करण्यासाठी त्यांच्याकडून असे प्रयत्न होत असतात. त्यामुळे त्यांना चोख प्रत्युत्तर देणे हे सर्व सावरकर प्रेमींचे काम असल्याचे पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.