– जयेश शत्रुघ्न मेस्त्री
काश्मिरमधील कुपवाडा येथील भात-पाक नियंत्रण रेषेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ( Statue of Chhatrapati Shivaji Maharaj) उभारण्यात आला आहे. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुतळ्याचे अनावरण केले. ‘आम्ही पुणेकर’ या संस्थेतर्फे हा पुतळा उभारण्यात आला आहे. या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्या देशाचे रक्षण करणा-या सैनिकांना प्रेरणादायी आणि ऊर्जादायी ठरेल. आपल्या देशाचा तिरंगा ध्वज शत्रूच्या छातीवर फडकवण्यासाठी नेहमीच जवानांना प्रेरणा देईल. त्यांचे मनोबल उंचावत राहील.’
एक काळ होता जेव्हा काश्मिर हा आपल्या हातातून निसटतोय की काय असं वाटू लागलं होतं. तिथे दहशतवादी आणि फुटिरतावादी यांची दादागिरी चालायची. अशा काळात नरेंद्र मोदी यांनी तिथे तिरंगा फडकावला होता. आज त्याच मोदींच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विराजमान झाला आहे. आपल्याकडे ‘पुतळे नको रुग्णालये बांधा’ असं म्हणणारे विनोदवीर खूप आहेत. मात्र काश्मिरमध्ये छत्रपतींचा पुतळा उभारण्यामागे खूप मोठा अर्थ दडला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी सीमा ओलांडून आलेल्या शत्रूंविरोधात लढा दिला. आपल्या देशातील जनतेला गुलामीची प्रचंड सवय झाली होती. त्या गुलामीच्या मानसिकतेतून आपल्याला छत्रपतींनी बाहेर काढलं आहे आणि हिंदू जनतेला त्यांनी विश्वास दिला की ’हा देश आपला आहे आणि इथे आपलं राज्य असलं पाहिजे. स्वराज्य असलं पाहिजे.’ त्यांच्यानंतर मराठी माणसाने परकियांची सत्ता नष्ट केली आणि भारतावर हिंदू राज्य स्थापन केलं. इतिहासकार म्हणतात की, जिथे जिथे मराठ्यांच्या घोड्याच्या टापा पडल्या, तो प्रदेश आज भारतात आहे. १९४७ ला पाक आपल्यापासून धर्माच्या आधारावर वेगळा झाला. त्यानंतर या पाकने भारतावर बऱ्याचदा आक्रमण केले. मात्र काँग्रेसी प्रवृत्तीच्या राज्यकर्त्यांना पाकला धडा शिकवता आला नाही.
(हेही वाचा – BJP च्या नमो उत्सवाला प्रचंड प्रतिसाद; मुंबई भाजपाची आदिवासी पाड्यात दिवाळी साजरी )
पुढे मोदींनी छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आदर्श समोर ठेवून सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक केले. त्यानंतर पाकला कळून चुकलं की आता भारतासोबत प्रत्यक्षात युद्ध वा लढाई करून काही फायदा नाही. पाकने ड्रग्ज, नकली नोट्स या माध्यमातून छुपे युद्ध सुरुच ठेवले आहे. पण आता पाक उघडपणे युद्ध करण्याची हिंमत करणार नाही एवढे मात्र खरे. कारण त्याला माहिती आहे की, या देशातील राज्यकर्ते अहिंसेच्या तत्त्वाचे अनुसरण करत नाहीत तर छत्रपती आणि सावरकरांच्या तत्त्वाचे अनुसरण करतात.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नियंत्रण रेषेवर असण्याला हेच महत्त्व आहे. पलीकडे जे शत्रू राष्ट्र आहे ते धर्मवेडाने पछाडलेलं आहे. या राष्ट्राने स्वतःच्या भल्याचा विचारच केला नसून त्यांनी केवळ भारताच्या अधोगतीचा विचार केला आहे. आपल्या माथी जर एखादे मोठे पाप असेल तर ते म्हणजे पाकिस्तानची निर्मिती. पाकिस्तानची निर्मिती म्हणजेच दुष्ट शक्तीची निर्मिती. छत्रपतींनी अशा अनेक दुष्ट शक्ती नष्ट केल्या आहेत. म्हणूनच तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात आला आहे. अश्वारुढ म्हणजे युद्धासाठी सज्ज असलेले महाराज. खरंतर हा संदेश आहे पाकिस्तानला की, ‘जर अफजलखान बनून याल तर तुमचा कोथळा काढल्याशिवाय भारत देश शांत बसणार नाही.’
Join Our WhatsApp Community