मुंबईतील पुतळे गेले कुठे?

मुंबईमध्ये दहा वर्षांपूर्वी तब्बल ८५ पुतळ्यांची नोंद होती, परंतु आता पुतळ्यांच्या नोंदींमध्ये केवळ ३९ पुतळेच दर्शवले जात असल्याने बाकीचे ४६ पुतळे गेले कुठे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

120

मुंबईमध्ये दहा वर्षांपूर्वी तब्बल ८५ पुतळ्यांची नोंद होती, परंतु आता पुतळ्यांच्या नोंदींमध्ये केवळ ३९ पुतळेच दर्शवले जात असल्याने बाकीचे ४६ पुतळे गेले कुठे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे पश्चिम उपनगरांमधील पुतळ्यांची बरीच संख्या कमी झाल्याचे आकडेवारींवरून स्पष्ट होत आहे.

( हेही वाचा : पीएफआयकडून कोट्यवधींचा दंड वसूल करण्याचा केरळ उच्च न्यायालयाचा आदेश)

मुंबईतमध्ये अनेक राष्टपुरुषांसह स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणारे नेते तसेच क्रांतिवीर आणि संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील नेते आदींचे पुतळे मुंबईतील विविध भागांमध्ये बसवण्यात आले आहेत. हे पुतळे कायमस्वरुपी मानले जात असले तरी महापालिकेने २०११-१२मध्ये मुंबईतील विविध सुविधांसंदर्भातील प्रसिध्द केलेल्या आकडेवारींमध्ये शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये एकूण ८५ पुतळे असल्याचे दर्शवले होते. परंतु सन २०२१-२२मध्ये प्रसिध्द केलेल्या आकडेवारींच्या कोष्टकांमध्ये पुतळ्यांची एकूण संख्या ३९ एवढी दर्शवली गेल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे आकडेवारींमधील प्रिटींग मिस्टेकमुळे कागदावरूनच हे पुतळे हटले कि प्रत्यक्षातच हे पुतळे हटवून सुरक्षेचा ताण कमी केला गेला की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सन २०११-१२मध्ये शहरांमध्ये एकूण ५५ पुतळे होते, तर पश्चिम आणि पूर्व उपनगरांमध्ये अनुक्रमे २२ व १०एवढी पुतळ्यांची संख्या होती. परंतु सन २०२१-२२मध्ये शहरांमध्ये केवळ १८ पुतळे दर्शवले जात आहेत, तर पश्चिम आणि पूर्व उपनगरांमध्ये ११ आणि १० एवढी पुतळ्यांची संख्या दर्शवली जात आहे. त्यामुळे नक्की मुंबईत पुतळे किती हा प्रश्न उपस्थित होत आहे.महापालिकेच्या पुरातन वास्तू विभागाचे प्रमुख अभियंता संजय सावंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी महापालिकेच्या ए विभाग कार्यालयांच्या हद्दीतच २७ पुतळे असल्याचे सांगितले.

एकीकडे पुतळ्यांची संख्या शहरांमध्ये जी १८ एवढी दर्शवली जाते, त्यातच तथ्य दिसून येत नाही. विशेष म्हणजे मागील दोन वर्षांमध्ये जहाँगीर आर्ट गॅलरीच्या समोरील जागेत स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माझगावमध्ये महाराज राणा प्रताप तसेच बोरीवलीमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्यांची भर पडल्याने महापालिकेच्या नोंदीवर पुतळ्यांची खोटी आकडेवारी आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार स्वर्गीय माँसाहेब मिनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर मुंबईत पुतळे बसवण्यास परवानगी दिली जात नव्हती. त्यामुळे पुतळे बसवण्याची संख्या वाढली नसली तरी ती यापूर्वीच्या संख्येत कमी होऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे महापालिका आणि पोलिस यांनी संयुक्तपणे मुंबईतील एकूण पुतळ्याची माहिती घेणे आवश्यक असल्याचे बोलले जाते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.