प्रातःविधीसाठी निघालेल्या एका तरुणावर गोळीबार करण्यात आल्याची घटना धारावी येथील पिला बंगला परिसरात शनिवारी सकाळी घडली. या गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाला लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या तरुणाच्या शरीरातून ३ गोळ्या काढण्यात आल्या असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी धारावी पोलिसांनी अज्ञात हल्लेखोराविरुद्ध गुन्हा दाखल करुन पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.
काय घडले नेमके?
अमीर शेख (२५) असे जखमी तरुणाचे नाव आहे. अमीर शेख हा धारावीतील पिला बंगला परिसरातील झोपडपट्टी मध्ये राहतो. अमीर हा टेम्पो चालक असून शनिवारी सकाळी तो प्रातःविधीसाठी सार्वजनिक शौचालयात जात असताना, अज्ञात हल्लेखोराने त्याच्यावर जवळून पाच राउंड फायर केल्या. त्यापैकी ३ गोळ्या अमीरला लागून तो जखमी झाला. गोळीबारानंतर हल्लेखोराने तेथून पळ काढला. गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी झालेल्या आमिरला तात्काळ लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करुन धारावी पोलिसांना कळवले.
(हेही वाचाः ‘या’ प्रकरणात राज ठाकरे झाले निर्दोष मुक्त!)
कोणी दिली सुपारी?
यानंतर पोलिसांचे एक पथक रुग्णालयात तर दुसरे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन ५ रिकाम्या पुंगळ्या जप्त केल्या आहेत. दरम्यान जखमी झालेल्या अमीरवर शस्त्रक्रिया करून त्याच्या शरीरातून ३ गोळ्या काढण्यात आल्या असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. अमीर हा पोलिसांना जबाब देण्याच्या परिस्थितीत नसल्यामुळे त्याच्यावर कुठल्या कारणामुळे गोळीबार करण्यात आला याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र धारावीत या गोळीबारानंतर उलटसुलट चर्च सुरू असून, ड्रग्स विक्रेत्या एका महिलेचे नाव समोर येत आहे. या महिलेनेच अमीरच्या हत्येची सुपारी दिल्याची चर्चा सुरू आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
धारावी पोलिसांनी अज्ञात हल्लेखोराविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, गुन्हे शाखा कक्ष-५ च्या पथकाने एका संशयित महिलेसह काही जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांची पोलिस कसून चौकशी करत आहेत. याबाबत पोलिसांकडून अद्याप कुठलीही अधिकृत माहिती मिळू शकलेली नसून तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
(हेही वाचाः हात आणि बोटे गमावणा-या तरुणाचे यशस्वी अवयव प्रत्यारोपण! अशी पार पडली शस्त्रक्रिया)
Join Our WhatsApp Community