रस्त्यावर बेकायदेशीररित्या व्यवसाय करणा-या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या ठाणे महापालिकेच्या महिला सहाय्यक आयुक्तांवर फेरीवाल्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना ठाण्यातील घोडबंदर रोडवर असलेल्या मार्केट परिसरात घडली. या हल्ल्यात महिला सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंगळे यांची तीन आणि सुरक्षा रक्षकांचे एक बोट हाताच्या पंजापासून वेगळे झाले आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. जखमी झालेल्या दोघांना तात्काळ उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात आणण्यात आले.
असा झाला हल्ला
महापालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकाम, फेरीवाले आणि हातगाड्यांवर सर्वच प्रभाग समितीमध्ये कारवाई सुरू आहे. त्यानुसार माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे या कासारवडवली भागातील मार्केट परिसरात अनधिकृत तसेच रस्ता किंवा पदपथ अडवणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी सोमवारी सायंकाळी गेल्या होत्या. कारवाई सुरू असतानाच संतप्त झालेल्या फेरीवाल्यांनी त्यांना विरोध करण्यास सुरुवात केली. दरम्यान अमरजित यादव या फेरीवाल्याने रागाच्या भरात गाडीवरील धारदार सुरा घेऊन पिंपळे यांच्या डोक्यावर हल्ला चढवला. पिंपळे यांनी हात डोक्यावर ठेवताच त्यावेळी त्या हल्ल्यात त्यांच्या डाव्या हाताची दोन बोटे पंजापासून वेगळी झाली, तर एका बोटाला क्रॅक गेला. या दरम्यान त्यांचा अंगरक्षक त्यांना वाचवण्यासाठी पुढे आल्यावर त्याच्याही एका बोटाला दुखापत झाली असून, त्यांच्या हाताचे एक बोट पंजापासून वेगळे झाले.
(हेही वाचाः वाझेने न्यायालयात ‘जे’ सांगितले त्यामुळे वातावरण झाले गंभीर… असं काय म्हणाला वाझे?)
https://youtu.be/JpM8KhquLCc
पोलिसांना दिली आत्महत्येची धमकी
या घटनेची माहिती मिळताच फेरीवाल्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना चाकूचा धाक दाखवून फेरीवाल्याने स्वतःच्या गळ्यावर चाकू फिरवून आत्महत्या करण्याची धमकी दिली. मात्र पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत या फेरीवाल्याला ताब्यात घेतले आहे. अमरजित यादव असे या हल्लेखोर फेरीवाल्याचे नाव आहे. कासारवडवली पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, अमरजित यादवसह काही फेरीवाल्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करताना सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंगळे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. हा हल्ल्यामुळे ठाणे महापालिका घाबरणार नाही. उलट फेरीवाल्यांच्या विरोधातील कारवाई अधिक तीव्र करणार आहे, कारवाई थांबवणार नाही, असे ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हिरवडे म्हणाले. pic.twitter.com/ujs2VbB1v0
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) August 30, 2021
हे गुन्हे दाखल
जखमी कल्पिता पिंपळे आणि अंगरक्षकाला उपचारासाठी ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करुन बोट जोडण्याचे काम सुरू असल्याची माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली आहे. याप्रकरणी रात्री उशिरा कासारवडवली पोलिसांनी हत्येचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, दंगल माजवणे प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
(हेही वाचाः धक्कादायक! आत्महत्या करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांविरोधात गुन्हे!)
Join Our WhatsApp Community