मुंबई महापालिकेच्या कफपरेडमधील “ग्रीन पार्क”ला मच्छीमारांचा तीव्र विरोध…

करदात्यांचे लाखो-करोडो रुपये पाण्यात घालणाऱ्या अरबी समुद्रातील प्रस्तावित ३०० एकरचे ग्रीन-पार्क करण्याच्या प्रकल्पाला स्थानिक मच्छिमारांचा तीव्र विरोध असून, जर सरकार ह्या प्रकल्पावर ठाम असल्यास समुद्रात होणाऱ्या सर्व प्रकल्पाला मच्छिमार समाजाचा विरोध असेल, असा इशारा अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र दामोदर तांडेल यांनी दिला.

स्थानिकांना उद्ध्वस्त करणारे प्रकल्प कायमचे रद्द करा

अरबी समुद्रात भराव टाकून ग्रीन-पार्क तयार करण्यासाठी होणारा खर्च, हा राज्य शासनाच्या तिजोरीत भर टाकणारा असून त्यातून राज्य शासनाला कसलाच अधिक महसूल प्राप्त होणार नाही. आधीच राज्य शासनाकडे महसुलाचा तुटवडा आणि त्यात अशा प्रकारच्या प्रकल्पांचा हट्ट केल्यास राज्यातील इतर अत्यावश्यक विकास कामे बाधित राहतील. सरकारने जनतेला भेडसावणारे प्रश्न सोडवण्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज असून, स्थानिक जनतेला उद्ध्वस्त करणारे सर्व प्रकल्प कायमचे रद्द करण्याची मागणी पत्राद्वारे राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगर विकास मंत्री ह्यांना दिल्याची माहिती समितीने दिली आहे.

(हेही वाचाः माटुंग्यातील उद्यानात समुद्री जलचरांची हजेरी!)

आंदोलनाचा इशारा

ग्रीन-पार्कमुळे समुद्रातील जैविकता नष्ट होणार असून समुद्रातील कोरल्स, वनस्पती, माशांचे प्रजनन क्षेत्र नष्ट होणार असल्याची माहिती समितीने दिली आहे. ग्रीन-पार्क प्रकल्प रद्द करा, हा स्थानिक भूमिपुत्रांचा नारा असून, सदर प्रकल्पाच्या विरोधात मच्छीमार समाज एकजुटला आहे. सरकारने ह्या विषयाची गांभीर्याने दखल घेतली नाही तर सरकारला नमवण्यासाठी संविधानाने दिलेल्या सगळ्या अधिकारांचा पर्याय अंमलात आणून, सरकार विरोधात रुद्र आंदोलन करणार असल्याचा इशारा तांडेल यांनी दिला आहे.

आमची मुंबई हरवून बसण्याची वेळ

पावसाळ्यात अर्ध्या अधिक मुंबई बुडीचे प्रमाण वाढत असताना, आता कोस्टल रोडमुळे त्यात अधिक भर पडणार आहे. दादर चैत्यभूमी, शिवाजी पार्क, वरळी, कफपरेड इत्यादी ठिकाणी समुद्रातील पाणी रस्त्यावर आल्याने पूरस्थिती निर्माण होत असतानाच, कफपरेड येथील समुद्रात ३०० एकर भराव टाकल्यास मुंबईत समुद्रातील लाटा खवळल्या जाऊन ते रस्त्यांवर येण्याची भीती आहे. त्यामुळे हा प्रकल्प मुंबईसाठी अत्यंत घातक आहे. ३०० एकर समुद्रात भर टाकून मुंबईचा इटलीतील ‘वेनिस’शहर करण्याचा महाप्रताप मनपा आणि राज्य प्रशासनाचा दिसून येत आहे. पूर्वी मुंबईचे ‘शांघाय’ आणि आता मुंबईचा ‘वेनिस’करता करता कदाचित “आमची मुंबई” हरवून बसण्याची दुर्दैवी वेळ आमच्या पुढील पिढीवर उद्भवणार असून, ही फार मोठी शोकांतिका असल्याची खंत तांडेल यांनी व्यक्त केली आहे.

(हेही वाचाः अंबानी प्रकरण : तिहार जेल कनेक्शन, इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्याचा मोबाईल जप्त!)

कोळीवाड्यांचे जतन करा

सदर परिसरात ४०० पेक्षा जास्त नौकाधारक असून पंचवीस हजार मच्छीमार मासेमारीतून आपली उपजीविका करतात. ह्या पार्कमुळे मच्छिमारांना जाण्या-येण्या पासून वंचित ठेवून त्यांना त्यांच्या रोजगारात अडथळा निर्माण होणार आहे. मच्छीमारांचे वेळ आणि पैशाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. ग्रीन-पार्कचा आधार घेऊन कदाचित कफपरेड कोळीवाडा उठवण्याचा सरकारी यंत्रणांचा डाव आहे, अशी भीती समस्त मच्छीमार बांधवांमध्ये आहे. मुंबईतले कोळीवाडे संपुष्टात आल्यास मुंबईची प्राचीन संस्कृती संपुष्टात येईल, म्हणून कोळीवाड्यांचे जतन हे सरकारचे सर्वप्रथम धोरण असले पाहिजे ही विनंती समितीकडून सरकारला करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here