विलेपार्ले येथील गोखले पूल आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील पुलांच्या दुघर्टनांनंतर मुंबईतील पुलांचे नियमित स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर आता शहर भागातील पुलांच्या तपासणीसाठी संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे शहर भागातील तब्बल ९८ पुलांच्या कामांवर संस्थांची नजर राहणार आहे. विशेष म्हणजे हिमालय पूल पाडून तीन वर्षे उलटता आली तरी अद्याप याच्या बांधकामाला सुरुवात झालेली नाही. परंतु तांत्रिक सल्लागाराला नियमित तपासणीसाठी दिलेल्या कंत्राटात हिमालय पुलासह हँकाँक पूल, माहिम पादचारी भुयारी मार्ग, लोअर परळ रेल्वे स्टेशनवरील उड्डाणपूल आदी पाडण्यात आलेल्या तथा काम सुरु असलेल्या कामांचाही समावेश आहे.
(हेही वाचा – “मलिकांचा राजीनामा घेतला नाही तर… “, भाजपने दिला इशारा)
तांत्रिक सल्लागार नेमण्यासाठी ‘ही’ कंपनी पात्र
मुंबई महापालिकेच्या अखत्यारितील पूल, भुयारी वाहतूक मार्ग, पादचारी पूल व स्कायवॉक इत्यादींचे निरीक्षण करून त्या पुलांची देखभाल व दुरुस्ती हाती घेण्यात येते. त्यामुळे या पुलांचे नियमित निरिक्षण आणि तपासणी करण्यासाठी पात्र व सक्षम तांत्रिक सल्लागाराची नेमणूक करणे आवश्यक असल्याने महापालिकेनेच्यावतीने या सल्लागाराची नेमणूक करण्यात येत आहे. याअंतर्गत शहर भागातील पुलांची दृश्य तपासणी करण्यात येते. दर सहा महिन्यांनी ही तपासणी करून याचा स्ट्रक्चरल अहवाल बनवला जातो. या नियमित तपासणीमध्ये संबंधित पुलांच्या बांधकामांमध्ये काही दोष आढळल्यास तसेच तीन वर्षांतून एकदा सर्व पुलांचे सखोल तसेच एनडीटीचा वापर करून याचा अहवाल बनवला जातो. याकरता तांत्रिक सल्लागार नेमण्यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये स्ट्रक्ट्रॉनिक्स कन्सल्टींग इंजिनिअर्स ही कंपनी पात्र ठरली असून नियमित तपासणीसह मुख्य तपासणीकरता ५ कोटी ३९ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.
शहर भागातील पुलांची आकडेवारी
- नाला व नदीवरील वाहतूक पूल : ७
- रेल्वेवरील उड्डाणपूल : २७
- उड्डाणपूल : १२
- पादचारी पूल : २४
- रेल्वेवरील पादचारी पूल : १२
- वाहतूक भुयारी मार्ग :०
- पादचारी भुयारी मार्ग : ०९
- आकाशमार्गिका (स्कायवॉक) : ०५
- मुक्त मार्ग : २
- परिमंडळ एक : पुलांची एकूण संख्या : ४४
- परिमंडळ दोन : पुलांची एकूण संख्या : ५४